आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पं. स. सभापतीपद, 6 ठिकाणी कुणालाही संधी?:14 पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण ठरले, 3 ठिकाणी निवडणुका लवकरच

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १४ पंचायत समितीच्या सभापतीपदांचे आरक्षण आज, गुरुवारी सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आले. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन येथे ही सोडत काढण्यात आली. दरम्यान येत्या काही दिवसांतच तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे अशा तीन पंचायत समित्यांमध्ये सभापतीपदाची निवडणूक घेतली जाणार आहे.

सध्या या तीन पंचायत समित्या वगळता इतरत्र प्रशासक राजवट असली तरी भविष्यात याच आरक्षण सूत्रानुसार निवडणुका होणार असल्याने या घटनेकडे राजकीय मंडळीचे लक्ष वेधले होते. त्यामुळे कोणत्या पंचायत समितीसाठी कोणत्या संवर्गाचे आरक्षण निश्चित झाले, याची विचारणा दिवसभर जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरु होती. सोडतीनुसार जिल्ह्यातील ६ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी कुणालाही संधी असून प्रत्येकी ३ तालुके अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) च्या उमेदवारासाठी राखीव झाले आहेत. याशिवाय २ पंचायत समित्यांमध्ये ओबीसी, व्हीजे/एनटीसह तयार झालेल्या नागरिकांच्या मागास प्रवर्गातील (नामाप्र) उमेदवाराला संधी असेल. विशेष असे की एकूण १४ जागांपैकी निम्म्या जागा महिलांसाठी राखीव न राहता त्यांच्या वाट्याला केवळ सहाच जागांचे सभापतीपद आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यातच पंचायत समितीच्या सभापतीपदांची आरक्षण प्रक्रिया निश्चित करुन दिली होती. त्यानुसार आज, गुरुवारी ही कृती करण्यात आली. सर्वप्रथम गेल्या पाच कालखंडात कोणती पंचायत समिती कोणत्या संवर्गासाठी आरक्षित होती, हे तपासून पाहण्यात आले. त्यानुसार पुढचा चक्रानुक्रम निश्चित करण्यात आला. अर्थात आरक्षणानंतर कोणत्या पंचायत समितीचे सभापतीपद महिलांसाठी राखीव ठेवावे, ही बाब चिठ्ठीव्दारे सोडत काढून ठरविली जाणार होती. परंतु आधीच्या पाच कालखंडाचा आढावा घेतल्यानंतर नेमक्या जेवढ्या जागा हव्या, तेवढ्याच शिल्लक राहिल्याने सोडतीची गरज भासली नाही. सन १९९६ ते २०१९ या काळातील आरक्षण विचारात घेता चक्रानुक्रमे पुढील आरक्षण जाहीर करण्यात आले.

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी आरक्षण सोडतीची कार्यवाही पूर्ण केली. निवडणूक विभागाचे प्रमोद देशमुख, किशोर झोंबाडे, अनुप उईके, वैभव मोरे, सीमा अढाऊ तसेच राधा तायडे यांनी आरक्षण सोडतीच्या कामकाजाचे व्यवस्थापन केले. राजकीय व्यक्ती, पत्रकार यावेळी उपस्थित होते.

असे आहे आरक्षण

पंचायत समिती अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सभापती पदासाठी अनु.जाती, नांदगाव खंडेश्वर अनु.जाती, अमरावती अनु. जाती (स्त्री), वरुड अनु. जमाती, चांदुर बाजार ना.मा.प्र., तिवसा ना.मा.प्र. (स्त्री), चांदुर रेल्वे सर्वसाधारण, दर्यापूर सर्वसाधारण, अचलपूर सर्वसाधारण, भातकुली सर्वसाधारण (स्त्री), मोर्शी सर्वसाधारण (स्त्री), धामणगाव रेल्वे सर्वसाधारण (स्त्री), धारणी अनु. जमाती तसेच चिखलदरा येथे अनु. जमाती (स्त्री) यांना आरक्षण जाहीर करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...