आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:दर्यापुरात दुचाकीच्या डिक्कीतून शिक्षकाचे 1.40 लाख एका क्षणात लंपास; चोरीचा प्रकार 'सीसीटीव्ही'त कैद

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
डिक्कीतून रक्कम चोरताना 'सीसीटिव्ही'त कैद झालेला संशयित. - Divya Marathi
डिक्कीतून रक्कम चोरताना 'सीसीटिव्ही'त कैद झालेला संशयित.

तालुक्यातील कोळंबी येथील एका शिक्षकाच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले १ लाख ४० हजार रूपये अज्ञात भामट्यांनी लंपास केल्याची घटना दर्यापूर शहरात आज, मंगळवारी भर दुपारी घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सायंकाळी गुन्हा दाखल केला असून सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला आहे.

तालुक्यातील कोळंबी येथील रहिवासी आणि नालावाडा येथे शिक्षक असलेले कैलास दयाराम डहाळे यांनी मंगळवारी दुपारी भारतीय स्टेट बँकेच्या स्थानिक शाखेतून १ लाख ४० हजार रुपये काढले. काढलेली रक्कम आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवून ते बाजारपेठेतील एका दुकानांमध्ये काही कामानिमित्त गेले होते. यादरम्यान त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी बॅकेपासून त्यांचा पाठलाग सुरु केला. कैलास डहाळे यांनी त्यांची दुचाकी दुकानाचे बाजूला उभी करून ते मोबाईल शाँपीमध्ये गेले. नेमक्या त्याचवेळी पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या भामट्यांनी डहाळे यांच्या मोटरसायकलच्या डिक्की मधून १ लाख ४० हजार रुपये लंपास केले.

शिक्षक कैलास डहाळे यांनी आपल्या दुचाकी ची डिक्की उघडून पाहिले असता त्यातील रक्कम चोरी झाल्याचे त्यांचे निदर्शनात आले. त्यांनी घटनेसंदर्भात तत्काळ दर्यापूर पोलीस स्टेशनला माहिती दिली. ठाणेदार संतोष ताले व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोघे भामटे चोरी करताना दिसून येत आहेत. पोलिसांनी शिक्षकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला असून सिसीटिव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरु केला आहे.