आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​अनास्थेचा संसर्ग:‘लम्पी’मुळे 1523 जनावरांचा मृत्यू; भरपाई केवळ 369 पशूमालकांना

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाच्या प्रकोपाने आतापर्यंत १ हजार ५२३ पशू धनाचा बळी घेतला आहे. परंतु, प्रत्यक्षात एकूण ९५ लाख नुकसान भरपाई मात्र, ३६९ पशू पालकांनाच मिळाली. त्यामुळे उर्वरित १ हजार १५४ पशू पालकांचे प्रस्ताव गेल्यानंतरही ते नुकसान भरपाई पासून अजूनही वंचित आहेत. विशेष बाब अशी की, विभागात अमरावती जिल्हा लम्पी आजाराने मृत्यूमुखी पडलेल्या पशू धनाबाबत दुसऱ्या स्थानावर असताना केवळ २७ टक्केच पशू पालकांना मदत मिळाल्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त आहेत. त्यात आणखी भर म्हणजे २५० पशुधन अति गंभीर स्थितीत आहे. त्यामुळे आणखी किती दिवस नुकसान भरपाई मिळणार नाही, आम्ही पात्र ठरणार की, नाही अशी चिंता पशू पालकांना सतावत आहे.

राज्यभरात पशू पालकांना ८.९५ कोटी रु. नुकसान भरपाई देण्यात आली. १ हजार ५२३ पशू धनाचा जिल्ह्यात लम्पीने मृत्यू होऊन पशू पालकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र तरीही त्यांना आतापर्यंत केवळ ९५ लाख रुपयेच मिळालेत. ही नुकसान भरपाई पुरेशी नाही. कारण दुधाळ जनावरांसाठी ३० हजार रु. दिले जात आहेत. त्या तुलनेत दुप्पटीने जास्त या जनावरांची किंमत आहे. जिल्ह्यातील एकूण २८७ गावे आतापर्यंत लम्पीच्या विळख्यात सापडली. यात १५२३ पशुधन दगावले तर १५,२११ पशुधन बरे झाले. ६,९१५ पशुधनावर उपचार सुरू आहेत. तलाठी, सरपंच यांच्याकडून अहवाल येण्यास उशीर होत असल्यामुळे उर्वरित ११५४ पशुपालक नुकसान भरपाई पासून अजुनही वंचित आहेत.

एकूण ४ लाख ५० हजार जनावरांपैकी ४ लाख १० हजार पशूंचे लसीकरण करण्यात आले आहे. लम्पी चर्म रोगामुळे जिल्ह्यातील पशू पालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आजवर केलेल्या खर्चाच्या तुलनेत नुकसान भरपाई ही फारच नगण्य आहे. पशूची किंमत तसेच त्यांना जगवण्यासाठी केलेला खर्च, औषधोपचार, चारा, वैरण याचही भरपाई या नुकसान भरपाईने होत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया पशुपालक शालिकराम भोजने यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...