आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंजनगाव सुर्जी तालुक्यातील शहानूर धरणाचे पाणी आता मुबलक प्रमाणात नागरिकांना मिळणार आहे. जुनी योजना कालबाह्य झाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने 30 वर्षानंतरची लोकसंख्या गृहीत धरुन 185.43 कोटी रुपयांचा प्रकल्प तयार केला आहे. दर्यापुर व अंजनगाव सुर्जी शहर आणि या दोन्हीसह भातकुली तालुक्यातील 156 हून अधिक गावांतील नागरिकांना या धरणातून पिण्याचे पाणी पोहोचविले जाते. या योजनेत आता अंतर्बाह्य बदल केले जाणार आहेत.
त्यासाठी काही ठिकाणी नवीन जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र, सोलर पॉवर प्लांट, जलवाहिनीतील बदल अशी कामे केली जाणार आहे. या कामाची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळविण्यात आली असून येत्या काही दिवसात निविदा प्रक्रिया पूर्णत्वास नेऊन प्रत्यक्ष कार्यारंभ केला जाईल, असे मजीप्राचे नियोजन आहे. दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व भातकुली तालुक्यांतील 156 गावांसाठीची ही योजना तीन दशकांहून अधिक वर्षांपासून अस्तित्वात आहे. सद्या या योजनेद्वारे दरडोई 40 लीटर पाणी पुरविले जाते. नवी योजना अस्तित्वात आल्यानंतर नागरिकांना दरडोई चाळीस लीटर दिले जाणारे हेच पाणी वाढून 55 लीटरवर पोचणार आहे.
विशेष असे की ही योजना गुरुत्वाकर्षण तत्वावर चालणारी असल्याने तिच्यासाठी विजेचा मोजकाच वापर करावा लागतो. भातकुली तालुक्यातील पाणी घेणारे शेवटचे घर हे मुख्य स्रोत अर्थात शहानूर धरणापासून सुमारे दीडशे किमी. अंतरावर आहे. परंतु तरीही पाणी पोचण्यात कधी खंड पडला, असे झाले नाही. दरम्यान मुळ योजनेचे वय कालबाह्य झाले असल्याने त्यात जुजबी दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी काही ठिकाणच्या जलवाहिन्या बदलविल्या जाणार असून काही गावांमध्ये नवे जलकुंभ उभारले जातील. त्याचवेळी सोलर पॉवर प्लांट, जलशुद्धीकरण केंदे, मुख्य संतुलन जलकुंभ अशी कामे केली जातील. परिणामी नागरिकांची सद्याची गरज भागवण्याइतपत पाणी त्यांना पुरविणे शक्य होणार आहे.
2054 साल डोळ्यासमोर ठेऊन नियोजन
ही योजना तयार करताना सन 2054 सालची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. सध्याची लोकसंख्या ही पावणे दोन लाखाच्या आसपास आहे. आणखी 15 वर्षानंतर (सन 2039 साली) ती 1 लाख 95 हजार 649 वर पोचणार असून सन 2054 साली 2 लाख 15 हजार 991 वर पोचेल.
या महिन्यात होणार निविदा प्रक्रिया
अमरावती मजीप्रा उप कार्यकारी अभियंता अजय लोखंडे म्हणाले की, या योजनेसाठीची निविदा प्रक्रिया चालू महिन्याच्या अखेरीस पुर्णत्वास जाईल, असा अंदाज आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने यापूर्वीही निविदा प्रक्रिया राबविली होती. परंतु पुरेसे निविदाधारक पुढे न आल्याने ती पूर्णत्वास जाऊ शकली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.