आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाळाबाजार करण्याच्या उद्देशाने कारंजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन शेत-शिवारात साठवून ठेवलेला रेशनचा १९ टन तांदूळ व एक टन गहू शुक्रवार, ३ जानेवारी रोजी कारंजा पोलिसांनी जप्त केला. या शासकीय धान्यासह, एक चारचाकी, एक दुचाकी असा एकूण ९.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त करत साठेबाजी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
तपोवन शिवारातील एका शेतात काही जण रेशनचा तांदूळ व गव्हाचा साठा करून त्याचा काळाबाजार करत असल्याची गुप्त वार्ता पोलिसांना मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकला. तपासादरम्यान याठिकाणी सलीम भिकाजी बाळापुरे, अलीम सलीम गुंगीवाले, तोहीद हसन भवानिवाले या तिघांनी रेशनच्या दुकानात वितरित केला जाणारा १९ टन तांदूळ व एक टन गहू एका चारचाकी वाहनात जमा करून ठेवला असल्याचे पोलिसांना आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी परवाना व अन्य कागदपत्रांची मागणी केली असता, ते सादर करण्यास तिघे असमर्थ ठरले.
अखेर पोलिसांनी पंचांसमक्ष रेशनचा १९ टन तांदूळ ज्याची अंदाजे किंमत १ लाख १९ हजार रुपये, १ टन गहू यांसह ७ लाख रुपये किंमतीचे एक चारचाकी वाहन व १५ हजार किमतीची एक मोटारसायकल असा एकूण ९ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही धडक कारवाई कारंजाचे उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकाने केली. असा गैरकारभार होत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.