आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्यानं म्हटली की टवटवीत फुले, त्यांचा दरवळणारा सुगंध, डोळ्यांना सुखावणारे शिल्प, हिरवळ, बालकांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यास आरामदायक खुर्च्या असे दृश्य डोळ्यापुढे येते. मात्र, मनपा क्षेत्रातील उद्यानांची एकूणच स्थिती बघता निराशा पदरी आल्याशिवाय राहात नाही. शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मनपाद्वारे शहरात १७२ लहान-मोठी उद्याने तयार करण्यात आली.
त्यापैकी ९० उद्याने ही कंत्राटी तत्त्वावर देण्यात आली असून, ८२ उद्यानांची देखभाल, दुरुस्ती मनपाकडे आहे. असे असताना कंत्राटी तत्त्वावर दिलेल्या उद्यानांच्या तुलनेत मनपाकडे असलेल्या उद्यानांच्या देखभालीसाठी जे कंत्राटी तत्त्वावर कामगार नेमले त्यांचे काम काहीसे उजवे असल्याचे उद्यानांची स्थिती बघितल्यानंतर दिसून येते. मनपा त्यांच्या उद्यानांची देखभाल करण्यासाठी सुमारे १० लाख रु. निधी वापरते. त्याचवेळी कंत्राटी तत्त्वावर दिलेल्या उद्यानांच्या देखभालीसाठी सुमारे २ कोटी रु. खर्च करते. उद्यानांची एकूणच स्थिती बघता. नाकापेक्षा मोती जड असा हा प्रकार आहे. एका कंत्राटदाराला मनपा वर्षाला २ लाख १८ हजार एका उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी देते, हे विशेष.
मनपा उद्यानांच्या स्थितीबाबत शहरवासीयांची ओरड सुरू झाल्यानंतर उद्यान अधीक्षक, सिस्टिम मॅनेजर व अतिरिक्त आयुक्तांनी शहरातील काही उद्यानांना भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली. त्यावेळी दुर्दशा झालेल्या उद्यानांच्या तीन कंत्राटदारांना तत्काळ नोटीस बजावण्यात आली. तसेच सात दिवसांच्या आत उत्तरही मागण्यात आले. आता तर ज्या कंत्राटदारांनी उद्यानांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले त्यांना तत्काळ ते सुस्थितीत आणण्यास बजावण्यात आले आहे. शहरातील उद्यानांमध्ये बसण्यासाठी असलेल्या आसनांची मोडतोड झाली आहे. काही ठिकाणी ब्लाॅक्स उखडले आहेत.
एका कंत्राटदाराला दुरुस्तीसाठी मनपा देते २ लाख १८ हजार रु.
मनपाने ९० उद्याने कंत्राटी स्वरूपात देखभाल दुरुस्तीसाठी दिली आहेत. प्रत्येक कंत्राटदाराला २ लाख १८ हजार रुपये दिले जातात. ९० गुणिले २ लाख १८ हजार असा हिशेब केल्यास १ कोटी ९६ लाख २० हजार एवढा खर्च अर्थात सुमारे २ कोटी रुपये मनपा खर्च करते. याशिवाय मनपा ८२ उद्यानांची स्वत: देखभाल करते. येथे कंत्राटी तत्त्वावर मनुष्यबळ नियुक्त केले असून त्यांना महिन्याला ८ ते १० हजार रु. वेतन दिले जाते. हे मनुष्यबळही ४३ च्या जवळ आहे. एकाकडे मनपाच्या दोन उद्यानांना सांभाळण्याची जबाबदारी असते.
कंत्राटदारांना नोटीस बजावल्या
शहरातील विविध उद्यानांना भेट दिल्यानंतर उद्यानांची स्थिती फारशी चांगली नसल्याचे आढळले. त्यामुळे कंत्राटदारांना नोटीस देऊन एका आठवड्याच्या आत उत्तर मागितले. तसेच काही उद्यानांची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. -हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त.,मनपा.
तत्काळ दुरुस्तीचे दिले आदेश
शहरातील काही उद्यानांचा विकासच होत नसल्याचे भेट दिल्यानंतर लक्षात आल्यामुळे कंत्राटदारांना तत्काळ दुरुस्ती करण्यास बजावले आहे. जर दुरुस्ती झाली नाही तर पुढे कारवाई करू. -अमित डेंगरे, सिस्टीम मॅनेजर, मनपा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.