आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या अमरावती-भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ सदस्यीय संचालक मंडळाची निवडणूक २८ एप्रिल रोजी होत आहे. सोमवार, ३ एप्रिल हा उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे संचालक पदासाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांची एकूण संख्या २१२ अशी निश्चित झाली आहे. शेवटच्या दिवशी तब्बल १५१ जणांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापूर्वी ५३ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. तर सुरुवातीच्या तीन दिवसांत ८ जणांनी अर्ज भरले होते. सहकार विभागाची ही निवडणूक म्हणायला राजकारणविरहित असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भविष्यातील निवडणुका लक्षात घेता त्यात सर्वच राजकीय पुढारी सहभागी होत आहेत. गेल्यावेळी ७५ टक्क्यांहून अधिक ठिकाणी सत्ता राखलेल्या काँग्रेसने यावेळी सर्वच ठिकाणी ‘सहकार पॅनल’ची घोषणा केली असून इतर समविचारी पक्ष-संघटनाही त्यात सहभागी होतील, असे म्हटले आहे. तर खा. नवनीत राणा व बडनेराचे आमदार रवी राणा यांनी माजी जि.प. सदस्य काँग्रेसचे प्रकाश साबळे यांना सोबत घेत शेतकरी पॅनलची घोषणा केली आहे.
अमरावती-भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांनी यावेळी स्वत:ला निवडणुकीपासून दूर ठेवले आहे. यापूर्वी त्यांनी सलग पाच वेळा कृउबासची निवडणूक लढून ती जिंकली आहे. त्यामुळे यावेळी स्वत:ला दूर ठेवून इतरांनी नेतृत्व करावे, असे त्यांनी ठरवले आहे. मागील संचालक मंडळापैकी ते एकमेव असे संचालक आहेत, जे निवडणूक रिंगणात नाहीत.
२९ एप्रिलला मतमोजणी प्राप्त सर्व २१२ अर्जांची छाननी ५ एप्रिलला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ६ तारखेला वैध उमेदवारी अर्जांची यादी घोषित केली जाईल. २० एप्रिलपर्यंत निवडणुकीतून माघार घेण्यासाठी मुभा देण्यात आली असून निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी २१ एप्रिलला घोषित केली जाईल. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप तर २८ एप्रिलला मतदान तर दुसऱ्या दिवशी मतमोजणी केली जाणार आहे.
अर्ज माघारीपर्यंत ठरवू पॅनल सध्या ही निवडणूक जोर धरत आहे. १८ जागांसाठी तब्बल २१२ अर्ज प्राप्त झाल्याने यावेळी चुरस अधिक दिसून येते. तूर्त समविचारी पक्ष, संघटना आणि उमेदवारांसोबत संपर्क सुरू आहे. सहकारात राजकारण नसते, अशी ही निवडणूक आहे. त्यामुळे कोण, कोणासोबत बसेल हे तूर्त सांगता येत नाही. विड्राॅलसाठी पंधरा दिवसांचा वेळ असल्याने अखेरच्या काही दिवसांतच हे चित्र स्पष्ट होईल. - विलास महल्ले, माजी सभापती, कृउबास, अमरावती.
भाजपने नेमले समन्वयक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपने तालुकानिहाय समन्वयक नेमले आहेत. या समन्वयकांनी स्थानिक पातळीवर आघाडी कोणासोबत होऊ शकते, याची चाचपणी केली आहे. जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्यामते या सर्व समन्वयकांची संयुक्त बैठक सोमवारी उशिरा सायंकाळी होत असून त्यातील निर्णयाअंती कोणत्या ठिकाणी कोणासोबत पॅनल गठित करायचे, याचा निर्णय घेतला जाईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.