आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरुस्तीकडे दुर्लक्ष:दररोज 22 लाखांची टोल वसुली ; तरी एक्स्प्रेस मार्गाची लागली वाट

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडनेरा ते तळेगाव श्यामजी पंत या ६६ किलोमीटरच्या महामार्गावर वाहन घेऊन येणाऱ्या किंवा जाणाऱ्या दुचाकी वाहन वगळता प्रत्येकाला नांदगाव पेठ नाक्यावर टोल स्वरुपात मोठी रक्कम मोजावी लागते. या ६६ किलोमीटरची देखभाल व दुरुस्ती टोल वसूल करणाऱ्या ‘आयआरबी’ कंपनीकडूनच केली जाते. मात्र, मागील काही महिन्यांपासून बडनेरा ते अमरावती हा बारा किलोमीटरचा महामार्ग ‘एक्सप्रेस हायवे’ अतिशय वाईट स्थितीत पोहोचला आहे.

अनेक ठिकाणी वाहन उसळते, काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहे तर काही ठिकाणी महामार्ग मधातच दबला आहे. हा रस्ता अखंड वाईट स्थितीत झाला नसला तरीही अनेक धोकादायक ‘स्पॉट’ या बारा किलोमीटरमध्ये अपघाताची प्रतीक्षा तयार करत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. मात्र, अजूनही संबंधित कंपनीला या बारा किमी मध्ये महामार्गाची डागडुजी करण्यासाठी जाग आलेली नाही.

टोलवरुन दरदिवशी १४ हजार वाहनांची ये-जा
नांदगाव पेठ टोलनाक्यावरुन दरदिवशी १४ हजार वाहनांची ये-जा होत असून,५५० वाहन हे शासकीय, पोलिस यांचे तर सुमारे १४५० वाहन हे नांदगाव पेठ येथे जातात. त्यामुळे उर्वरित १२ हजार वाहनांकडून दरदिवशी सुमारे २२ ते २३ लाख रुपये टोल प्राप्त होतो.-शैलेश देशपांडे, व्यवस्थापक, टोल नाका, नांदगाव पेठ.

वेगातील वाहनाला झटका बसतो
बडनेरा ते अमरावती मार्गावर एका पुलाजवळ वेगात असलेल्या वाहनाला झटका बसतो तसेच इतरही काम करण्याबाबत ‘आयआरबी’ला आम्ही सूचवले आहे. कामसुद्धा लवकरच सुरू होणार आहे.
विलास ब्राम्हणकर, महाव्यवस्थापक तथा प्रादेशिक संचालक, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण.

दुरुस्तीचे लवकरच काम सुरू करणार
आमच्याकडे बडनेरा ते तळेगाव (दोन्ही लेन मिळून) सुमारे १३४ किलोमीटरच्या मार्गाचे देखभाल दुरुस्तीचे काम आहे. त्यापैकी सुमारे १०५ किमीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम झालेले आहे. बडनेरा ते अमरावती या मार्गाचेही काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
-चंद्रशेखर भागवत, व्यवस्थापक, (देखभाल व दुरूस्ती) आयआरबी.

बातम्या आणखी आहेत...