आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात राहणाऱ्या एका तरुणाला ऑनलाइन पद्धतीने टास्क देवून २५ दिवसात त्याची २३ लाख १ हजार ८७७ रुपयांनी ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. सायबर क्राइममध्ये अलीकडेच उदयास आलेल्या ‘टास्क फ्रॉड'' या नव्या पद्धतीने या तरुणाची फसवणूक झाली आहे.
या प्रकरणी तरुणाने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलिसांनी अनोळखी बँक खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इम्रान नजर खान (३३, रा. अलहिलाल कॉलनी, अमरावती) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. इम्रान खान हे ऑनलाइन व्हिडिओ पाहत असताना त्यांना एक जाहीरात दिसली. त्यामध्ये चित्रपटांना रेटींग केल्यास आपल्याला बोनस आणि कमिशन मिळेल. त्यानंतर एका लिंकवर क्लिक केल्यास त्यांना रजिस्ट्रेशन करण्याबाबत सांगण्यात आले. त्यांनी रजिस्ट्रेशन केले.
त्यानंतर ३० चित्रपटांच्या रेटींगचा पहिला टास्क देण्यात आला. या चित्रपटांना रेटींग देवून टास्क पूर्ण झाला, त्यासाठी त्यांना ८५० रुपये तसेच दुसऱ्यांदा टास्क पूर्ण केल्यानंतर ३ हजार ५०० रुपये मिळाले. त्यानंतर वारंवार त्यांना चित्रपटांना रेटींगचे काम देण्यात येत होते. सुरूवातीला एक ते दोन वेळा रक्कम दिल्यामुळे इम्रान खान यांना विश्वास बसला. त्यानंतर त्यांना प्रिपेड टास्क देण्यात आला.
यामध्ये सुरूवातीला रक्कम भरल्यानंतर संबंधिताला ऑनलाईन टास्क दिला जातो, ताे पुर्ण केल्यानंतर त्यावर बोनस किंवा कमिशनच्या रुपात अतिरिक्त रक्कम देण्यात येईल, रक्कम जितकी जास्त तेवढी कमाई जास्त, असेही सांगण्यात आले होते.
काय आहे ‘टास्क फ्रॉड'' ?
सायबर गुन्हेगार दर काही महिन्यात फसवणुकीसाठी नवे नवे फंडे आणतात. मागील महिना ते दोन महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांनी टास्क फ्रॉड हा प्रकार आणला आहे. यामध्ये ऑनलाइन लिंकद्वारे एखादे काम दिले जाते. त्यामध्ये चित्रपट रेटींग, चित्रपट समीक्षण, टायपिंग करणे, लाईक, कॉमेंट करणे असे काही काम दिले जाते.
हे काम केल्यावर सुरूवातीला एक, दोन, तीनवेळा रक्कम सुध्दा ते देतात. एकदा समोरच्या व्यक्तीचा विश्वास बसला की, अतिरिक्त रक्कम परताव्याचे आमीष दाखवून त्याच्याकडून प्रीपेड टास्क द्वारे ऑनलाइन तसेच बँकेतून खात्याद्वारे रक्कम उकळतात आणि रक्कम जास्त झाली की, रक्कम न देताच संपर्क बंद करतात.
यालाच टास्क फ्रॉड म्हणतात. शहरात टास्क फ्रॉडचे हे दुसरे प्रकरण असल्याची माहिती सायबर ठाण्याचे एपीआय रवींद्र सहारे यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही ऑनलाइन टास्कमध्ये अडकू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.