आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमरावती शहरात दिवाळीनिमित्त खऱ्याखुऱ्या सोन्याने सजलेला मिष्टपदार्थ तयार करण्यात आला आहे. येथील रघुवीर मिठाइयां यांनी यंदा दिवाळीसाठी चक्क २४ कॅरेट अस्सल सोन्याचा मुलामा दिलेली ‘सोनेरी भोग’ नावाची मिठाई तयार केली आहे. या मिठाईचा प्रतिकिलो दर तब्बल सात हजार रुपये आहे.
दरवर्षी दिवाळीत अनोख्या मिठाया आणण्याची ‘रघुवीर’ची परंपरा आहे. यापूर्वी त्यांनी गोल्ड बिस्कीट, सोनेरी पान तयार केले होते. यंदा मात्र थेट अस्सल सोन्याचा मुलामा चढवलेली सोनेरी भोग मिठाई त्यांनी तयार केली आहे. या मिठाईमध्ये मामरा बादाम, पिस्ता, हेजलनट आणि केशरचा वापर केला आहे. तसेच एक किलोे मिठाईमध्ये जवळपास एक ग्रॅम २४ कॅरेट सोने वापरले आहे. ही मिठाई राजस्थानी कारागीर-आचारी तयार करत आहेत. यंदाच्या दिवाळीत ही मिठाई आकर्षण ठरत आहे. गुजरातेत काही दुकानांत सोन्याचा वापर करून मिठाई तयार केली जाते. ती पाहिल्यानंतरच अमरावतीकरांसाठी सोन्याची मिठाई तयार करण्याचे ठरवले होते, असे रघुवीरचे संचालक चंद्रकांत पोपट यांनी सांगितले.
८ ते १० दिवस चव कायम
ही मिठाई तयार केल्यानंतर सुमारे ८ ते १० दिवस चांगली राहते. त्यानंतर मात्र मिठाईच्या चवीतही थोडाफार फरक पडतो आणि ती कडकही होते.
खास दिवाळीनिमित्त तयार केली
दरवर्षी दिवाळीनिमित्त नवीन मिठाई तयार करतो. यंदा ‘सोनेरी भोग’ तयार केली आहे. या मिठाईला अस्सल २४ कॅरेट सोन्याचा मुलामा असून एक किलो मिठाईवर सुमारे १ ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे. या मिठाईला चांगली पसंती मिळाली आहे.
- चंद्रकांत पोपट, संचालक, रघुवीर मिठाइयां.
नोएडावरून आणले ‘गोल्ड वर्क’
‘सोनेरी भोग’ मिठाईसाठी वापरण्यात येणारे २४ कॅरेट सोन्याचे वर्क हे नोएडावरून आणले आहे. कारण ते तयार करण्यासाठी लागणाऱ्या मशीन त्याच ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती संचालकांनी दिली. मिठाईवर वरील बाजूने पूर्णपणे सोन्याचा मुलामा चढवला आहे. ही मिठाई तयार करण्यासाठी इतर मिठायांच्या तुलनेत दुप्पट वेळ लागतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.