आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजनिर्मिती:जिल्ह्यात सौर पॅनलच्या माध्यमातून होणार 245 मेगावॉटची वीजनिर्मिती

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना सिंचनासाठी आठवड्यातून केवळ तीन दिवस आठ तास वीज दिली जाते. त्यातही अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे पीकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतात जाऊन ओलित करावे लागत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सौर कृषी वीजवाहिनी योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याच योजनेतंर्गत जिल्ह्यात आगामी वर्षभरात ९८० एकरावर सौर पॅनलची उभारणी करुन वीज निर्मिती करण्यात येणार आहे. त्याद्वारे सुमारे २४५ मेगावॅाट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वी या योजनेबाबत अमरावतीत माहिती दिली होती. त्याचवेळी त्यांनी संबंधित विभागांना या याेजनेच्या अंमलबजावणीसाठी तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरणने या योजनेच्या उभारणीचे काम सुरू केले आहे. सौरऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात जागा लागणार आहेे. जिल्ह्यातील सर्वच भागातील कृषी पंपाना वीजपुरवठा करण्यासाठी एकूण १२२५ एकर जागेवर सौर पॅनल उभे करावे लागणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात म्हणजेच आगामी वर्षभरात त्यापैकी ९८० एकरावर सौर पॅनलची उभारणी करावी लागणार आहे.

त्यासाठी महावितरणला जिल्हाभरात एका ठिकाणी किमान पाच एकर जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध होईल ती जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने वापरता येईल. तसेच ज्या ठिकाणी शासकीय जागा नाही, अशा ठिकाणी शेतकऱ्यांकडून लीजवर जागा घेण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११५ एकर शासकीय जागा सौर पॅनल उभे करण्यासाठी निश्चित झाली असून, १७३ एकर खासगी जागा लीजवर घेण्यासंदर्भात प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

दरम्यान, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना वीजेची कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी वीजेचे सर्व फिडर सौरऊर्जेवर आणणार आहे. त्याद्वारे निर्मित होणाऱ्या विजेने येत्या काळात शेतकऱ्यांना १२ तास वीज देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अशी होणार २४५ मेगावॉट वीजनिर्मिती
चार एकर जागेत सौर पॅनल उभे केल्यानंतर एक मेगावॅट वीज निर्मीती होते. त्यामुळे ९८० एकर जागेत सौरपॅनल लावल्यानंतर २४५ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. या योजनेतंर्गत महावितरण जिल्ह्यातील २०० कृषी फिडर व ३८ उपकेंद्र जोडणार आहे. संबंधित उपकेंद्रावर कृषी पंपांसाठी लागणाऱ्या विजेचा भार लक्षात घेता त्याठिकाणी सौरपॅनल उभे करुन वीजनिर्मिती केली जाणार आहे.त्याची तयारी सुरु आहे.

हजारो शेतकऱ्यांना होईल फायदा
मुख्यमंत्री सौर कृषी वीजवाहिनी योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पहिल्या टप्प्यात आगामी वर्षभरात ९८० एकर जागेवर सौर पॅनल उभे करुन त्याद्वारे वीजनिर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. याद्वारे सुमारे २४५ मेगावॅट वीजनिर्मिती होईल. ९८० एकर जागेत उभारलेल्या सौर पॅनलमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.-दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता, महावितरण.

बातम्या आणखी आहेत...