आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • 258 Villages Of Amravati To Vote On 18th December For Gram Panchayats To Implement Code Of Conduct; The Nomination Form Can Be Filled From November 28

258 गावांमध्ये आचारसंहिता लागू:ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान; 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरता येणार

अमरावती5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याचा एक-चतुर्थांश हिस्सा व्यापेल एवढ्या 258 गावांमध्ये आज, बुधवारपासून ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. या सर्व ग्रामपंचायतींद्वारे 2 हजार 99 सदस्यांची निवड केली जाणार असून त्यासाठी 18 डिसेंबरला मतदान होईल.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आज सायंकाळी त्यासाठीचा रितसर कार्यक्रम घोषित केला. जिल्ह्यातील सर्व चौदाही तालुक्यांमध्ये ही निवडणूक होत असून सर्वाधिक 26 ग्रामपंचायती चिखलदरा व दर्यापुर तालुक्याच्या तर सर्वात कमी 7 ग्रामपंचायती धामणगाव रेल्वे तालुक्याच्या आहेत. या सर्व ग्रामपंचायतींची मतदार यादी गेल्या आठवड्यातच घोषित करण्यात आली. तत्पूर्वी त्या-त्या ठिकाणची प्रभाग रचना व त्यातील आरक्षण घोषित करण्यात आले होते. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणूक घोषित होईल, असे भाकीत यापूर्वीच प्रशासकीय यंत्रणेने वर्तविले होते. आयोगाने आज कार्यक्रम घोषित केल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

निवडणूक आयोगाच्यावतीने जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी या निवडणुकीची स्वतंत्र अधिसूचना बुधवारी सायंकाळी घोषित केली. त्यानुसार चिखलदरा व दर्यापूर तालुक्यातील प्रत्येकी 26, चांदूरबाजार व मोर्शी तालुक्यातील प्रत्येकी 24, धारणी, अचलपूर व वरुड तालुक्यातील प्रत्येकी 23, नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रत्येकी 17, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील 13, तिवसा व अमरावती तालुक्यातील प्रत्येकी 12, भातकुलीतील 11 आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक होत आहे. आज, बुधवारी सायंकाळी निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने त्यात क्षणापासून या गावांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्यामते या सर्व ग्रामपंचायती मिळून 2 हजार 99 सदस्यांची निवड करतील.

निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 18 नोव्हेंबर रोजी त्या-त्या तालुक्यांचे तहसीलदार, जे या निवडणुकीसाठी सहायक निवडणूक अधिकारी आहेत, या निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. त्यानंतर 28 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या काळात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळात उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. 5 ला छाननीअंती विधीग्राह्य अर्जांची यादी घोषित केली जाणार असून 7 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार उभे आहेत, अशा वार्डांमध्ये 18 डिसेंबरला मतदान घेतले जाईल. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 ही मतदानाची वेळ आहे. त्यानंतर 20 डिसेंबरला मतमोजणीअंती निकाल घोषित केला जाईल.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

निवडणूक नोटीसची घोषणा - 18 नोव्हेंबर

उमेदवारी दाखल करणे - 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर

उमेदवारी अर्जांची छाननी - 5 डिसेंबर

उमेदवारी मागे घेणे - 7 डिसेंबर

मतदान - 18 डिसेंबर

मतमोजणी - 20 डिसेंबर

बातम्या आणखी आहेत...