आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उपचारानंतर 2664 रुग्णांना मिळाली नवी दृष्टी

अमरावती12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सामान्य रुग्णालयात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत मोतीबिंदू शस्त्रक्रियांसह काही नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे आतापर्यंत २ हजार ६६४ नागरिकांना नवी दृष्टी मिळाली आहे. त्यामुळे त्यांना अगदी स्पष्टपणे जग बघणे शक्य झाले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र चिकित्सा विभागात नुकत्याच दोन नि:शुल्क नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. या दोन्ही शस्त्रक्रिया मेळघाटातील आदिवासींवर करण्यात आल्या हे विशेष. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अंधत्व निवारण व दृष्टीक्षिणता कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी येथे ३० खाटांचा नेत्र विभाग सुरू करण्यात आला आहे.

या विभागात सात महिन्यांत १४०५ महिला, तर १२५७ पुरुषांच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. एप्रिल महिन्यात ७७६, मेमध्ये ३०१, जूनमध्ये ३६५, जुलैमध्ये ४०२, आॅगस्टमध्ये २६५, सप्टेंबरमध्ये ४६८, आॅक्टोबरमध्ये ३८५ नेत्र शस्त्रक्रिया झाल्या. सर्वाधिक शस्त्रक्रिया या सप्टेंबर महिन्यात झाल्या आहेत.

स्वतंत्र नेत्र विभाग सुरू झाल्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात ग्रामीण व आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणात नेत्र रुग्ण उपचारासाठी येत आहेत. यात बहुतांश गरीब व गरजू रुग्ण असतात. त्यांना खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करणे परवडत नाही. त्यामुळे अशा रुग्णांसाठी इर्विन रुग्णालयातील नेत्र विभाग वरदान ठरला आहे. विशेष बाब अशी की, बहुतेक शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्यामुळे डाॅक्टरांचेही मनोबल उंचावले आहे. त्यामुळे यापुढील काळातही मोतीबिंदू शस्त्रक्रियांसह काही नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया
जिल्हा सामान्य रुग्णालयात गरीब व गरजू रुग्णांच्या डोळ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात बहुतांश रुग्णांवर बिना टाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना नवी दृष्टी प्रदान करण्यात आली. तर दोन शस्त्रक्रिया या नेत्र प्रत्यारोपणाच्या यशस्वी झाल्या.- डाॅ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक.

दृष्टी मिळाल्याने अनेकांना आनंद
मोतीबिंदूमुळे दृष्टी कमी झाल्यानंतर अनेक ग्रामीण तसेच आदिवासी भागातील गरीब, गरजू रुग्णांना आपण यापुढे हे जग स्पष्टपणे बघू शकू, अशी आशा वाटत नव्हती. परंतु, त्यांच्या डोळ्यांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना आनंद झाला आहे. इतरही गरजू नेत्र रुग्णांमध्ये इर्विनच्या नेत्र विभागामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...