आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीएवढेच नुकसान सततच्या पावसानेही झाले होते. परंतु नियमात तरतूद नसल्याने संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नव्हती. अखेर आज, बुधवारी शासनाने याबाबतचा अंतिम निर्णय घेतला असून संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे ठरवले आहे.
त्यामुळे येत्या आठवडाभरात जिल्ह्याला २७७ कोटी ५८ लाख ९९ हजार ९१६ रुपयांची मदत मिळणार आहे. या निर्णयामुळे मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या २ लाख १६ हजार ३०४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कृषी सचिवांच्या फेर आढाव्यानंतर ही मदत देण्याचा निर्णय झाला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने तशी सूचना केली होती. गेल्या पावसाळ्यात अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततचा पाऊस हा अगदी पाठशिवणीचा खेळ झाला होता. सरकारी नियमानुसार अतिवृष्टीमुळे (६५ मिलीमीटरहून अधिक) झालेल्या नुकसानासाठी मदत देण्याची तरतूद आहे. परंतु सततच्या पावसामुळे झालेल्या शेती नुकसानाबाबत अशी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे ही मदत मिळेल की नाही, याबाबत प्रचंड संभ्रम होता.
तत्कालीन कृषी मंत्री यांच्या पहिल्याच दौऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करुन मदतीची मागणी नोंदविली होती. शिवाय विशेष बाब म्हणून सरकारने २७७ कोटी ५८ लाख ९९ हजार ९१६ रुपयांची मागणीही तत्वत: मान्य केली होती. परंतु प्रत्यक्ष रक्कम न पाठविल्याने शेतकरी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवित होते, तर प्रशासन वरचेवर राज्य शासनासोबत पत्रव्यवहार करीत होते. दरम्यानच्या काळातच कृषी सचिवांच्या नेतृत्वातील समितीद्वारे फेरआढाव्याचे नवेच पिल्लू समोर आले. त्यामुळे आधी आशा पल्लवीत केल्या, परंतु आता मात्र हिरमोड होण्याची भीती अशी स्थिती निर्माण झाली होती. ताज्या घडामोडीमुळे या सर्व शक्यतांना लगाम लागला असून संबंधितांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यात २ लाख १६ हजार ३०४ शेतकऱ्यांच्या १.७१ लाख हेक्टरवरील पिकाला सततच्या पावसाचा फटका बसल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला होता. मोर्शी, वरुड व धारणी वगळता उर्वरित ११ तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्ये खरीप पिकांसह ओलीताची शेती करणारे शेतकरी आणि फळबागधारकांचाही समावेश आहे. बाधित झालेले एकूण शेती क्षेत्र १ लाख ७१ हजार ४९१.५५ हेक्टर आहे. शासनाच्या वेळोवेळी बदलणाऱ्या भूमिकेमुळे हे सर्व शेतकरी हवालदिल झाले होते.
असे आहे बाधित शेतकरी
अमरावती (९,९९०), तिवसा (६,१२४), भातकुली (४०,५०४), चांदूर रेल्वे (४,९४३), धामणगाव रेल्वे (४,७०५), नांदगाव खंडेश्वर (७,२३४), दर्यापुर (४८,१८३), अंजनगाव सुर्जी (३१,०६०), अचलपूर (२८,०११), चांदूर बाजार (१०,२५१) व चिखलदरा (१,६११). या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या आठवडाभरात रक्कम जमा होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.