आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत व्यावसायिकाचा खून:दुचाकीवर येत गळा चिरून 3 हल्लेखोर फरार; शहराच्या घंटीघड्याळ परिसरातील घटना

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सरोज चौकात असलेल्या अमित मेडीकलचे (व्हेटर्नरी औषधी) संचालक उमेश प्रल्हादराव कोल्हे (54, रा. घनश्यामनगर, सातुर्णा, अमरावती) यांच्यावर मंगळवारी (दि. 21) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास तिघांनी चाकूने हल्ला केला. यावेळी मारेकऱ्यांनी त्यांचा गळा चिरून खून केला आहे. घटनेनंतर तिन्ही हल्लेखोर पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेने शहरातील व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उमेश कोल्हे यांचे अमरावती तहसिल कार्यालयासमोरील रचनाश्री मॉलमध्ये अमित मेडिकल आहे. व्हेटर्नरी औषधांसाठी काेल्हे यांचे मेडीकल प्रसिध्द आहे. दरम्यान मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास कोल्हे मेडिकल बंद करून घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा संकेत व स्नुषा वैष्णवीसुध्दा होते. एका दुचाकीने उमेश तर दुसऱ्या दुचाकीने मुलगा व स्नुषा जात मागून येत होते. मेडीकलपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर सरोज चौकाकडून श्याम चौकात जाणाऱ्या गल्लीत घंटीघड्याळपासून जवळच एका दुचाकीवर तिन हल्लेखोर आले. यावेळी एक जण दुचाकीवरच होता तर दोघे खाली उतरले होते, त्यापैकी एकाने चाकूने कोल्हे यांच्या गळ्यावर एकच वार केला. याचवेळी मागून दुसऱ्या दुचाकीने मुलगा संकेत आला, संकेत व त्यांची पत्नी अवघ्या 25 ते 30 मीटर अंतरावर असताना हल्लेखोरांनी उमेश यांच्यावर हल्ला चढवला. त्यावेळी संकेत यांनी धाव घेवून उमेश यांना तत्काळ बाजूलाच असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्लेखोर कोण होते, त्यांच्यावर हल्ला का झाला, कारण हल्लेखोरांनी त्यांच्या खिशांना हात लावला नाही, यावरुन लूटमार करणे, हा उद्देश मारेकऱ्यांचा असावा, असे प्रथमदर्शनी वाटत नसल्याचे कोतवाली पोलिसांनी सांगितले. दरम्यान या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून बुधवारी अमरावती डिस्ट्रीक्ट केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्त विक्रम साळी यांनी भेट घेवून तातडीने आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. मात्र बुधवारी दुपारपर्यंत पोलिसांना या प्रकरणात मारेकऱ्यांबाबत कोणताही सुगावा लागला नव्हता.