आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील बनोसास्थीत डॉ. साबळे हाॅस्पिटल ते सरळ थेट हिंगणी गावात जाण्यासाठी 8 किमी. लांबीचा रस्ता आहे. मात्र या रस्त्याची सुरूवात व शेवट जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने टप्प्याटप्प्याने केला आहे. मात्र मध्येच 3 किमी. रस्ता अजूनही तयार झाला नसल्याने ठिकठिकाणी पूर्णत: उखडला असून खड्डेच खड्डे पडले आहेत.
त्यामुळे ग्रामस्थ व प्रामुख्याने शेतकरीवर्गाला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कित्येकदा किरकोळ अपघातही झालेत. या रखडलेल्या रस्त्याचे काम पुर्ण व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी आजी-माजी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही या गंभीर व त्रासदायक समस्येकडे केलेल्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
दर्यापूर-हिंगणी रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. दरदिवशी शेतकऱ्यांना शेतशिवारात ये-जा करावी लागते. दरम्यान दर्यापूर-हिंगणी या रस्त्याचे दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात खडीकरण, तर काही अंतरापर्यंत डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र मध्येच 3 किमी. रस्त्यावर खडीकरण-डांबरीकरण झालेच नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. शेतशिवारात वाहन घेवून जाणे, तर सोडा खड्डेमय रस्त्यावरून पायी चालतानाही मोठी कसरत करावी लागते. अपुर्ण चिखलमय रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असल्यामुळे जगाचा पोशींदा असलेल्या शेतकऱ्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत.
यापेक्षा भयानक विदारक बाब कोणती?
शेतकरी बाजीराव निकम म्हणाले की, मध्येच रस्ता अर्धवट असल्याने शेतात खतांचे पोते, मजूर नेणे तसेच शेतातील माल घरी आणण्यास मोठी जीवघेणी कसरत करावी लागते. लोकप्रतिनिधींना वारंवार सांगूनही समस्या ‘जैसै थे’च आहे. शेतापर्यंत शेतकऱ्यांना ये-जा करताना तारेवरची कसरच करावी लागत असेल, तर यापेक्षा भयानक विदारक गोष्ट नाही.
निधी प्राप्त होताच कामाला देणार प्राधान्य
दर्यापूर जि. प. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नरेंद्र निबुदे म्हणाले की, 2018-19 पासून प्रति वर्षी निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने हिंगणी-दर्यापूर रस्त्याचे काम करण्यात आले आहे. आगामी या वर्षीच्या आर्थिक बजेटमध्ये हिंगणी रस्त्याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. निधी प्राप्त होताच उर्वरीत रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्यास प्राधान्य देण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.