आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका या मोठ्या थकबाकीदारासह जिल्ह्यातील विविध सरकारी व निमसरकारी यंत्रणांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे ३४४ कोटी ३१ लाख ८६ हजार रुपये थकवले आहेत. या प्रचंड थकबाकीमुळे मजीप्राचा घसा कोरडा झाला असून, येत्या काळात सार्वजनिक पाणी पुरवठा अडचणीत येण्याची भीती निर्माण झाली आहे. थकीत रकमेच्या वसुलीसाठी मजीप्राने वारंवार पत्रव्यवहार केला. प्रत्यक्ष संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. मात्र तरीही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा मजीप्राच्या अधिकाऱ्यांचा अनुभव आहे.
तशी वेळ ओढवू नये, यासाठी प्राधिकरणने केवळ ‘मुद्दल द्या, व्याज माफ करू’, अशी योजना घोषित केली आहे. परंतु त्यालाही संबंधित यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमरावती मनपाकडे सर्वाधिक २६८ कोटी २२ लाख ५५ हजारांची थकबाकी आहे. यात १६१ कोटी ७१ लाख १७ हजार रुपये मुद्दल आणि १०६ कोटी ५१ लाख ३८ हजार रुपये व्याजाचे आहेत. या खालोखाल ४३ कोटी ३ लाख १४ हजार रुपयांची थकबाकी अंजनगाव सुर्जी येथील पाणी पुरवठा यंत्रणेने केली आहे. यामध्ये २१ कोटी १३ लाख ६० हजार रुपये मुद्दल आणि २१ कोटी ८९ लाख ५४ हजार रुपये व्याजाचे आहेत.
दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील १५६ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या शहानूर धरणावरील योजनेकडे १० कोटी ५६ लाख २६ हजार रुपये थकीत आहेत. यामध्ये ७ कोटी ८ लाख ६६ हजार रुपये मुद्दल आणि ३ कोटी ४७ लाख ६० हजार रुपये व्याजाचे आहेत. अचलपूर तालुक्यासह अंजनगाव सुर्जी तालुक्यासाठी तयार केलेल्या याच धरणावरील आणखी एका योजनेने मजीप्राचे ८ कोटी ५२ लाख ८३ हजार रुपये थकवले आहेत. यामध्ये ५ कोटी ६२ लाख ८७ हजार रुपये मुद्दल तर २ कोटी ८९ लाख ९६ हजार रुपये व्याज, अशी विभागणी आहे.
दर्यापूर शहरासाठीच्या स्वतंत्र पाणी पुरवठा यंत्रणेकडे (नगरपालिका) ५ कोटी ६३ लाख ९५ हजार रुपये थकीत आहे. त्यात ३ कोटी ६८ लाख ३८ हजार मुद्दल आणि १ कोटी ९५ लाख ५७ हजार रुपये व्याजाचे आहेत. तर अमरावतीचा ग्रामीण भाग आणि भातकुली तालुक्यातील काही गावांसाठी तयार केलेल्या पाणी पुरवठा योजनेकडे ४ कोटी ६५ लाख १८ हजार रुपये थकीत आहेत. यामध्ये ४ कोटी ६० लाख ५३ हजार रुपये मुद्दल तर केवळ ४ लाख ६५ हजार रुपये व्याजाचे आहेत.
याशिवाय चिखलदरा नगरपालिकेकडे २ कोटी ५६ लाख ७७ हजार रुपये मुद्दल आणि १ कोटी ११ लाख १८ हजार रुपये व्याज असे एकूण ३ कोटी ६७ लाख ९५ हजार रुपये थकीत आहेत. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी थकबाकीदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. रकमेचा भरणा वेळेत न केल्यास व्याजामुळे मूळ रक्कम कशी फुगते आणि पुढे तो भुर्दंड कसा त्यांच्याच डोईवर बसतो, हेही लक्षात आणून दिले. परंतु तरीही फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.