आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रॅम दागिने:पीडीएमसी’मध्ये महिला रुग्णाचे सोन्याचे 35 ग्रॅम दागिने गायब

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपघात झाल्यामुळे एका महिलेला शहरातील पीडीएमसी रुग्णालयात एक्सरे काढण्यासाठी नेले होते. यावेळी एक्सरे करण्यापूर्वी या महिला रुग्णासोबत असलेल्या वॉर्ड बॉयने महिलेच्या गळ्यात असलेले ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन काढून ठेवण्यास सांगितले व स्वत: काढून घेतले. काही वेळानंतर महिलेच्या नातेवाइकांनी त्याला विचारले की, सोन्याचे गंठण कुठे आहे तर, तो म्हणाला मला माहीत नाही. यावरुन महिला रुग्णाच्या नातेवाइकाने शुक्रवारी (दि. १८) गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली.

शिवम कैलाश चौडे (२१, रा. विशाल कॉलनी, अमरावती) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. शिवम यांच्या आईचा अपघात झाल्यामुळे शिवमने त्यांना १६ नोव्हेंबरला पीडीएमसीमध्ये एक्सरे काढण्यासाठी नेले होते. दरम्यान, एक्सरे काढण्यापूर्वी त्यांच्यासोबत असलेल्या वॉर्ड बॉयने त्यांना सांगितले की, त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढावे लागणार आहे. त्यावेळी शिवमचे भाऊ, तसेच त्यांची एक महिला नातेवाईकसुद्धा हजर होती. काही वेळाने त्या वॉर्ड बॉयनेच शिवमच्या आईच्या गळ्यात असलेले सुमारे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण (किंमत ७५ हजार रुपये) शिवम याच्या

नातेवाइकांसमक्ष काढून घेतले. त्यानंतर एक्सरे करण्यात आला. एक्सरे झाल्यानंतर शिवम, वॉर्डबॉय व शिवमची आई हे सर्व डॉक्टरांकडे ओपीडीमध्ये तपासणीसाठी गेले. तपासणी झाल्यानंतर शिवम यांना आईच्या गळ्यात गंठण नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या वॉर्डबॉयला विचारले, तर त्याने मला माहीत नाही, माझ्याजवळ सोन्याचे गंठण नाही, असे त्याने सांगितले. मात्र, सोन्याचे गंठन न दिसल्यामुळे ते चोरी झाले असून संबंधित वॉर्ड बॉयनेच चोरल्याचा संशय पोलिस तक्रारीत शिवम चौडे यांनी वर्तवला आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी संशयाच्या आधारे वॉर्डबॉय विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी पीडीएमसी परिसरातून किंवा पीडीएमसीच्या बाहेरुन अनेकदा दुचाकी चोरीला गेल्या आहेत, अजूनही अधूनमधून जातातच, मात्र आता रुग्णाचे दागिनेसुद्धा रुग्णालयाच्या आतमधून चोरीला गेल्यामुळे ‘पीडीएमसी’तील सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी चर्चा याच ठिकाणच्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांत सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...