आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीनतेरा:जिल्ह्यात 40 बस धूळखात; अनेक बस कधीही बंद पडण्याच्या स्थितीत

स्वप्निल सवाळे | अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामंडळाने अमरावती विभागाला गेल्या तीन वर्षांपासून एकही नवी लालपरी (एसटी) दिली नाही. त्यातच ज्या जुन्या बसेस होत्या, त्यापैकी ४० बसेस कुचकामी असल्याने धूळखात पडून आहेत. अनेक बस गाड्यांना १० ते १२ वर्षे झाली आहेत. त्यांनाही आता ‘ब्रेकडाऊन’ची घरघर लागल्याने त्या कशाबशा खडखड आवाज करत धावत आहेत.

विभागातील आठही आगारात असलेल्या ३६१ पैकी ५० टक्के बसेसची स्थिती वाईट आहे. त्या कधी दम सोडतील याचा नेम नाही. सुरक्षित प्रवासाच्या नावावर एसटी महामंडळ भाडेवाढ करत असले तरी प्रवाशांच्या आरामाबाबत मात्र गंभीर नाही. त्यामुळे प्रवाशांना नाइलाजाने धक्के खात प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी वैतागले आहेत.

जिल्ह्यात अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी व चांदूर बाजार या आठ बसस्थानकात एकूण ३६१ बसेस आहे. परंतु, यातील ४० बसेस पूर्णत: बंद पडल्या आहेत. यात १५ बसेस इंजिन नादुरुस्त झाल्याने बंद असून ४ बसेस अपघातग्रस्त आहेत. याशिवाय १२ बसेस इतर कारणांमुळे पडून आहेत.

नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात
दररोज कामासाठी कुऱ्हा ते अमरावती एसटीने प्रवास करावा लागतो. कधी-कधी एसटी बस नादुरुस्त असते. यावेळी इंजिनमधून आवाज येतो. त्यामुळे प्रवासात खूप त्रास होतो. एसटी महामंडळाने नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात.
- अजय पिसोडे, प्रवासी

८० नवीन बसेसची मागणी
सद्या आठही आगारांमध्ये ३६१ बसेस आहे. त्यापैकी ४० बसेस नादुरुस्त आहेत. यात काही अपघातग्रस्त, काही नादुरुस्त, काहींचे इंजिन खराब झाले आहे. आम्ही ८० नव्या बसेसची मागणी केली आहे.- नीलेश बेलसरे, विभागीय नियंत्रक, अमरावती.

दोन वर्षात ७४ भंगार बसेस विकल्या
गेल्या दोन वर्षांत अमरावती विभागात ७४ एसटी बसेसचे आयुष्य संपले. त्यामुळे त्या भंगार झाल्या होत्या. त्यांची विक्री केली आहे. त्यानंतरही महामंडळाने एकही नवी बस दिली नाही. त्यामुळे आहे त्या बसेसच्या भरवशावर काम भागवले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...