आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • 45 Percent Voting Of Graduates, 90 Percent Of Principal professors, Final Results Will Be Overcast Due To Ballot Papers, Counting Of Votes Tomorrow For 'Senate'

‘सिनेट’साठी उद्या मतमोजणी:पदवीधरांचे 45, प्राचार्य- प्राध्यापकांचे 90 टक्के मतदान, मतपत्रिकेमुळे शेवटचा निकाल रात्री येणार

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधीसभा (सिनेट), अ‌ॅकडेमीक कौन्सिल (विद्वत) व अभ्यास मंडळांच्या (बीओएस) निवडणुकीत 90 टक्के प्राचार्य-प्राध्यापकांसह 45 टक्के पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावल्याचा अंदाज विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मंगळवार, 22 नोव्हेंबरला सदर मतांची मोजणी केली जाईल. पसंतीक्रम नोंदवायचा असल्याने मतपत्रिकेद्वारे ही निवडणूक घेण्यात आली. त्यामुळे शेवटच्या निकालाला मंगळवारची रात्र उजाडणार, असे संबंधित यंत्रणेचे म्हणणे आहे.

सिनेटच्या 36 आणि विद्वत परिषदेच्या 6 जागांसह अभ्यास मंडळाच्या प्रतिनिधींसाठी आज, रविवार, 20 नोव्हेंबरला मतदान घेण्यात आले. सकाळी 7 ते सायंकाळी 5 अशी मतदानाची वेळ होती. त्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये 63 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांमध्ये सर्वात जास्त भरणा पदवीधरांचा होता.

पदवीधर मतदारांची संख्या 35 हजार 659 आहे. यापैकी दुपारी 4 वाजेपर्यंत 40 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. याशिवाय प्राचार्य आणि प्राध्यापकांपैकी बहुतेकांचे मतदान आटोपले होते.

सिनेटच्या 36 जागांसाठी 100 तर विद्वत परिषदेच्या 6 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात आहेत. यापैकी कोण बाजी मारणार, हे मंगळवारच्या मतमोजणीअंती ठरविले जाईल. या निवडणुकीत एकूण 40 हजार 554 मतदारांना मतदानाची संधी होती. त्यापैकी प्राचार्य-प्राध्यापकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. मात्र पदवीधरांचा टक्का 45 च्या पुढे जाऊ शकला नाही.

या निवडणुकीत 3 हजार 413 महाविद्यालयीन शिक्षक (प्राध्यापक) असून शिक्षण संस्थाचालकांच्या प्रतिनिधींची संख्या 239 आहे. प्राचार्य मतदारसंघाची मतदार संख्या 119 असून विद्यापीठ शिक्षकांची संख्या सर्वात कमी 59 आहे. राज्याचे माजी कृषिमंत्री तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह नुटाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण रघुवंशी, शिक्षण मंचचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप खेडकर, जस्टीस पॅनलचे प्राध्यापक डॉक्टर कमलाकर पायस या तीन पुढाऱ्यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक लक्षवेधक बनली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांच्या नेतृत्वात सुमारे 400 कर्मचाऱ्यांचा ताफा निवडणूक कामात व्यग्र आहे.

शिवाजीच्या मैदानात गर्दीच गर्दी

श्री. शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित शिवाजी बीपीएड व शिवाजी बीएड हे जुळे महाविद्यालय या निवडणुकीसाठीचे सर्वात मोठे आणि प्रमुख मतदान केंद्र होते. सुमारे 12 हजार मतदार या केंद्राशी जोडले गेल्याने या ठिकाणी मतदारांची सर्वाधिक गर्दी होती. शिवाजी बीपीएडला पदवीधरांची तर शिवाजी बीएडला प्राध्यापकांच्या मतदानाची सोय करण्यात आली होती. माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख, माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख, श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, हरिभाऊ मोहोड यांच्यासह सर्वच पॅनलचे दिग्गज तळ ठोकून बसले होते.

बातम्या आणखी आहेत...