आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर व ग्रामिण पोलिस दलाच्या पोलिस शिपाई पदासाठी रविवारी (दि. 2) लेखी परिक्षा घेण्यात आली. दरम्यान शहर पोलिस दलाने घेतलेल्या लेखी परिक्षेला 222 उमेदवार पात्र ठरले होते मात्र प्रत्यक्षात केवळ 114 उमेदवारांनीच परिक्षा दिली. यावेळी तब्बल 49 टक्के उमेदवारांनी परिक्षेला दांडी मारली. शहर पोलिस दलात पोलिस शिपाई पदाच्या जागा कमी असल्यामुळे उमेदवारांनी लेखी परिक्षेकडे पाठ फिरविल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पहिल्यांदाच पोलिस भरतीमधील लेखी परिक्षा मुंबई वगळता राज्यभरात एकाचवेळी आणि एकाचदिवशी झाली आहे. पोलिस शिपाई या पदासाठी अमरावती शहर पोलिस दलात 20 जागांसाठी भरती प्रक्रीया पार पडली. या 20 जागांसाठी 222 उमेदवार पात्र ठरले होते. मात्र 222 पैकी तब्बल 108 उमेदवार गैरहजर होते. यंदा उमेदवारांना विवीध पोलिस दलात मैदानी चाचणी वेगवेगळ्या दिवशी देता आली मात्र लेखी परिक्षा एकाचवेळी होती. त्यामुळे ज्या दलात अधिक जागा उपलब्ध आहे, किंवा मैदानी चाचणीत शहर दलाच्या तुलनेत अधिक गुण मिळाले आहे, त्या ठिकाणी उमेदवारांनी लेखी परिक्षेला प्राधान्य दिले. दुसरीकडे शहर पोलिस दलात पोलिस शिपाई पदाच्या 20 जागाच आहे. म्हणूनच शहर पोलिस दलाच्या परिक्षेकडे तब्बल 49 टक्के उमेदवार गैरहजर राहीले. शहर पोलिसांकडून लेखी परिक्षेसाठी शहरातील विद्याभारती महाविद्यालय परिक्षा केन्द्र ठेवण्यात आले होते.
याचवेळी ग्रामिण पोलिस दलात पोलिस शिपाई पदाच्या 156 जागांसाठी 1 हजार 863 उमेदवार लेखीसाठी पात्र ठरले होते. ग्रामिण पोलिसांनी शहरातील चार महाविद्यालयात परिक्षा केन्द्र ठेवले होते. यावेळी 1 हजार 863 उमेदवारांपैकी 286 म्हणजेच 15 टक्के उमेदवार गैरहजर होते. दोन्ही पोलिस दलाच्या परिक्षा अतिशय शांततेत पार पडल्या आहेत. उमेदवारांना परिक्षा केन्द्रावरुन बाहेर पडतेवेळीच त्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका (कार्बन कॉपी) देण्यात आली. तसेच तासाभरातच बरोबर असलेल्या उत्तरांची यादी (अॅन्सर कि) वेबसाईडवर अपलोड करण्यात आली. त्यामुळे आपल्याला किती गुण मिळाले, हे उमेदवारांना लगेच कळले आहे. तसेच दोन्ही पोलिस दलांकडून रविवारी रात्रीपर्यंत लेखी परिक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर काही दिवसातच अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.