आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोड टॅक्स:एका दुचाकीसह जिल्ह्यात 49 वाहनांना ‘बीएच’ नंबर प्लेट

अमरावती7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरीनिमित्त वारंवार राज्य बदलवणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व ठराविक चार गटातील व्यक्तींसाठी आता आरटीओकडून ‘बीएच’ नंबर प्लेट देऊन वाहनांचे रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा आहे. ही नंबर प्लेट वाहनाला असल्यास देशातील कोणत्याही राज्यात तुम्हाला विनात्रास प्रवास करता येणार आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत ४९ वाहनांना ‘बीएच’ नंबर प्लेट देऊन आरटीओ कार्यालयाने रजिस्ट्रेशन केले आहे. यामध्ये ४८ कार व एका दुचाकीचा समावेश असल्याचे आरटीओ कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

भारत सरकारने नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी ‘बीएच’ नंबर प्लेट म्हणजे भारत मालिका (सिरीज) सुरू केली आहे. ‘बीएच’ नंबर प्लेट लावल्यानंतर संबंधित वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर वाहन नोंदणी हस्तांतरित करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे आपण आजवर वाहन घेतल्यानंतर त्या वाहनाच्या नोंदणीवेळीच १५ वर्षांचा रोड टॅक्स आरटीओकडे भरणा करतो. हा रोड टॅक्स आपल्या राज्यात वाहनाच्या एकूण किमतीच्या १० ते १३ टक्के घेतला जातो. मात्र ‘बीएच’ नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करताना वाहन मालकाला दोनच वर्षांचा रोड टॅक्स भरावा लागतो. परंतु दर दोन वर्षांनी संबंधित वाहन मालकाला हा रोड टॅक्स भरावा लागणार आहे. त्यामुळे तुलनेत तो काहीसा अधिक राहणार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ‘बीएच’ सिरीजची ४९ वाहन मालकांनी नोंदणी केली असून, त्यांना आरटीओकडून त्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये ४८ कार असून एका दुचाकीचाही समावेश आहे. या ४९ वाहन मालकांना यापुढे देशातील कोणत्याही राज्यात गेल्यानंतर पुन्हा संबंधित राज्याच्या आरटीओत जाऊन नोंदणी करावी लागणार नाही किंवा रस्त्यावरून जाताना संबंधित राज्यातील पोलिस किंवा आरटीओ थांबवून कागदपत्र तपासणी व इतर त्रास होण्याची शक्यता फार कमी आहे.

सर्वसामान्यत: कोणत्याही वाहनासाठी राज्याच्या पद्धतीनुसार नंबर प्लेट तयार केली जाते. (उदा - प्रथम राज्याच्या नावातील दोन अक्षर, त्यानंतर संबंधित जिल्ह्याचा आरटीओ कोड नंतर संबंधित जिल्ह्यात आरटीओ नोंदीनुसार सुरू असलेल्या सिरीजची दोन इंग्रजी अक्षर व नंतर चार क्रमांक) मात्र ‘बीएच’ नंबर प्लेटचे स्वरुप पूर्णत: वेगळे आहे. ‘बीएच’ सिरीजसाठीही ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटचाच वापर केला जातो. मात्र त्यावर कोणत्याही राज्याच्या दोन अक्षरांचा वापर न करता थेट ‘बीएच’ (भारत) असे नमूद करून चार अंकी क्रमांक व सीरीज दिली जाते. हा क्रमांक देण्यासाठी केंद्रीय स्तरावर स्वतंत्र व्यवस्था असून संबंधित आरटीओ कार्यालय त्या यंत्रणेसोबत संपर्क करून ‘बीएच’ क्रमांक देतात.

4 गटातील व्यक्तींना मिळू शकते ‘बीएच’ नंबर प्लेट
बीएच नंबर प्लेट चार गटातील व्यक्तींना त्यांच्या मागणीनुसार व निकषातील आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर दिली जाते.- राजाभाऊ गिते, आरटीओ, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...