आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत 5 दिवसीय कृषी महोत्सव सुरू:तृणधान्य, नैसर्गिक अन्नधान्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध- खा. अनिल बोंडे

अमरावती19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तृणधान्य व प्राकृतिक अन्नधान्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा सरकारतर्फे सक्रीय प्रयत्न होत आहे. जिल्हा कृषी महोत्सव हा त्यादृष्टीने शेतकरी बांधवांमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरेल, असे प्रतिपादन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे केले.

कृषी विभाग व आत्मा यांच्या सहकार्याने येथील सायन्सकोर मैदानावर पाच दिवसीय नैसर्गिक कृषी, तृणधान्य व जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. खासदार नवनीत राणा अध्यक्षस्थानी होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री रवींद्र कोल्हे, निवेदिता चौधरी, माजी महापौर चेतन गावंडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, कृषी सहसंचालक किसनराव मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, 'आत्मा'च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. बोंडे पुढे म्हणाले की, शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजनांची भरीव अंमलबजावणी होत आहे. राज्य शासनाने गत सहा महिन्यात शेतकरी हितासाठी अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नवे तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे. कृषी अवजार, ट्रॅक्टरवाटपाच्या कामांनाही वेग आला आहे. आपत्तीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून हेक्टरी मदतीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. पांदणरस्त्यांची कामेही वेळेत पूर्ण व्हावीत, असा प्रयत्न आहे. शेतकरी बांधवांना कृषी तंत्रज्ञान, निविष्ठा, पीकपद्धती याबाबत माहिती व मार्गदर्शन मिळण्यासाठी महोत्सवात अनेकविध मार्गदर्शन सत्रांबरोबरच स्थानिक बचत गटांच्या उत्पादनांचे व धान्य विक्रीचे कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. कोविडकाळात अन्नधान्य उत्पादनाचे कार्य शेतकरी बांधवांनी अविरत सुरू ठेवले. शेतकरी बांधवांच्या हितासाठी पांदणरस्ते योजना, वस्त्रोद्योग आदींना चालना मिळावी, तसेच तृणधान्य उत्पादनवाढीसाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मेळघाट तृणधान्यासाठी प्रसिद्ध आहे. न्यूट्रिशनल व्हॅल्यू राखण्यासाठी ताजेपणा महत्वाचा असतो. कुटकी या धान्याचा ब्रँड विकसित होऊ शकतो. मेळघाटातील शेतकरी बांधवांना शेतमाल विकण्यासाठी अमरावतीत हक्काची बाजारपेठ असावी, असे कोल्हे यांनी सांगितले.

पौष्टिक तृणधान्याचे विशेषत: भरडधान्यांचे जिल्ह्यातील क्षेत्र वाढण्यासाठी व त्याचे महत्व सर्वदूर पोहोचविण्यासाठी महोत्सवाचा उपयोग होईल, असे जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी सांगितले. मेळघाटातील शेतकरी बांधवांना उत्पादनविक्रीसाठी अमरावतीत मेळघाट हाट हे स्वतंत्र दालन विकसित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मेळघाटातील आदिवासी महिला कार्यकर्ता जिजीबाई मावसकर यांनी मनोगतातून भरडधान्यांचे महत्व व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...