आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपत्तीत दिलासा:जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी 533 कोटी मंजूर ; शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टी, पूरस्थिती व संततधार पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमरावती जिल्ह्याने मागितलेली ५३३ कोटी १४ लाख ६५ हजार ३१४ रुपयांची रक्कम राज्य शासनाने मंजूर केली आहे. ही रक्कम येत्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाला प्राप्त होताच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली असेल, असे निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी सांगितले.

राज्य शासनाने अलीकडेच जुने निकष बदलून नुकसानाची मर्यादा एक हेक्टरने वाढवत तीन हेक्टरवर नेली. त्याचवेळी नुकसान भरपाईची रक्कमही ‘एनडीआरएफ’च्या तुलनेत थेट दुप्पट केली. त्यामुळे जिल्ह्यासाठी मंजूर झालेली मदत अडीचशे कोटीहून (जुन्या निकषानुसार) थेट ५३३.१४ कोटींवर पोहोचली आहे. ही मदत जिल्हाभरातील २ लाख ९१ हजार ९१९ शेतकऱ्यांना वितरीत केली जाईल. खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर १३ हजार ६००, बागायती पिकांसाठी प्रति हेक्टर २७ हजार तर फळ पिकांसाठी प्रति हेक्टर ३६ हजार रुपये याप्रमाणे ही मदत दिली जात आहे.

प्रशासनाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ९८० शेतकऱ्यांची २ लाख ५६ हजार ९५५.३९ हेक्टर जमिनीतील खरीप पिके अतिवृष्टीमुळे खराब झालीत. त्याचवेळी २ हजार ६२ शेतकऱ्यांच्या १ हजार २५२.५१ हेक्टर मधील बागायती पिकांना अतिवृष्टी व संततधार पावसाचा फटका बसला. अशारितीने खरीप शेती करणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ३४९ कोटी ४५ लाख ९३ हजार ३०४ रुपयांची तर बागायतदारांना ३ कोटी ३८ लाख १७ हजार ७७० रुपयांची मदत दिली जाणार आहे. जिल्ह्यातील २ लाख ९१ हजार ९१९ शेतकऱ्यांचे ३ लाख ८ हजार २९२.७४ हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले. त्यापोटी ५३३ कोटी १४ लाख ६५ हजार ३१४ रुपयांची मदत दिली जाणार आहे.

सोमवारपर्यंत मदतीची रक्कम जिल्हा स्तरावर येणार शासनाच्या नव्या निकषानुसार केलेल्या सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल गेल्या आठवड्यात शासनाला पाठवला होता. त्यानुसार ५३३.१४ कोटींची रक्कम मंजूर झाली आहे. ही रक्कम सोमवारपर्यंत जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार असून, तालुकानिहाय विभागणी नंतर आठवडाभरात ती प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. -विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...