आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासकीय अनास्था:नैसर्गिक आपत्तीचे 542 कोटी जमा; शेतकऱ्यांच्या खात्यात छदामही नाही

रवींद्र लाखोडे | अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनातर्फे जिल्हा प्रशासनाला सुमारे ५४२ कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. या रकमेचे तालुकानिहाय विभाजन करुन ती तहसीलदारांच्या खात्यातही वळतीही करण्यात आली. परंतु दसरा-दिवाळी तोंडावर आली असतानाही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एक छदाम सुद्धा जमा झाला नाही. बँकेला याद्या कुणी पोहोचवायच्या यावरुन महसूल आणि कृषी विभागात एकमत न झाल्याने ही वेळ ओढवली आहे. दरम्यान या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी विभागीय आयुक्तांनी उद्या, सोमवार, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता बैठक बोलावली आहे. माहे जून ते ऑगस्ट या काळात जिल्ह्यातील २ लाख ९१ हजार ९१९ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला.

ठिकठिकाणी प्रशासन विरुद्ध शेतकरी
२४ तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला की सरकारी भाषेत अतिवृष्टी झाल्याची नोंद केली जाते. अशा अतिवृष्टीग्रस्त भागात शेतजमीन व शेतपिकांचा मोठे नुकसान होते. त्यामुळे राज्य शासनातर्फे मदत घोषित करण्यात येते. परंतु प्रत्यक्षात ती न मिळाल्याने जिल्हाभरातील शेतकरी त्रस्त झाले असून ठिकठिकाणी प्रशासन विरुद्ध शेतकरी असे प्रसंग निर्माण होत आहेत.

आयुक्तांसोबत आज चर्चा
आम्हीही शेतकऱ्यांची मुले आहोत. त्यांचे संकट आमचे आहे. आम्ही पंचनामे करुन दुकानाच्या याद्या प्रशासनाला पुरवल्या. त्यानुसार शासनाकडून मदत प्राप्त झाली. परंतु कृषी सहाय्यकांनी खाते क्रमांकासह बँकेला पोहोचवायच्या याद्या न पुरवल्यामुळे हे संकट ओढवले आहे. या मुद्द्यावर सोमवारी दुपारी विभागीय आयुक्तांनी बैठक बोलावली आहे.-विशाल ढोले, जिल्हाध्यक्ष, विदर्भ पटवणारी संघ, अमरावती.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार रक्कम
मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी लागते.अमरावती जिल्ह्यात अद्याप ती जमा झाली नाही. याबद्दल शनिवारी महसूल मंत्र्यांनी सूचना केल्या असून सोमवारी, ३ ऑक्टोबरला बैठक बोलावण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी रक्कम शेतकऱ्यांना मिळेल, अशी व्यवस्था केली जाईल.-डॉ. दिलीप पांढरपट्टे, विभागीय आयुक्त, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...