आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लम्पी स्कीन:मेळघाटातील झिल्पी, पाडिदम गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराची 55 गुरांना लागण

अमरावती/ धारणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विशिष्ट डास आणि गोचीड यांच्या चावण्यामुळे जनावरांना होणारा त्वचेचा आजार ‘लम्पी स्कीन डिसीज’ सध्या डोके वर काढू पाहत आहे. अमरावती जिल्ह्यात मध्यप्रदेशमार्गे हा आजार पोहोचला असून धारणी तालुक्यातील झिल्पी व पाडिदम या दोन गावांतील ५५ गुरांना या आजाराने आपल्या कवेत घेतले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याधिकाऱ्यांनी मेळघाटातील पशूंच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घातली असून, पशुपालकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

अलिकडेच या आजाराने शेजारच्या अकोला जिल्ह्यात थैमान घातले होते. त्यामुळे तो त्या दिशेने अमरावतीत पोहोचेल, अशी भीती होती. जिल्ह्याच्या पशुवैद्यक यंत्रणेने त्या दिशेने योग्य ती पावलेही उचलली होती. परंतु यंत्रणा अकोला-अमरावतीच्या सीमेवर लक्ष ठेऊन असतानाच मध्यप्रदेशमार्गे या आजाराने मेळघाटात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सध्या पशुवैद्यकांचे पथक धारणी तालुक्यात पोहोचले असून ज्या गुरांना लम्पी स्कीन डिसीजची बाधा झाली, त्यांचे लसीकरण करुन त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या पशुंमध्ये बहुतेक बैलांचा समावेश आहे.

पोळ्याच्या निमित्ताने मेळघाटच्या सीमेवरील बुऱ्हाणपुरसह बैतुल जिल्ह्यातील काही गावांमध्ये बैलगाडी शर्यत भरवली जाते. परंपरेचा भाग म्हणून झिल्पी व पाडीदम आणि आसपासच्या गावांतील पशुपालकही या शर्यतीत भाग घ्यायला गेले होते. त्यामुळेच हा आजार पसरला असावा, असा पशुवैद्यक यंत्रणेचा अंदाज आहे. त्यामुळे लागण झालेल्या पशूंना (बैलांना) विलगीकरणात ठेवण्यात आले असून, त्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्याचवेळी हा आजार पसरू नये, म्हणून सध्या त्या भागातील पशूंच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

पशुवैद्यकांच्या मते डास आणि गोचीड यांच्या संक्रमणामुळे हा आजार पसरतो. तो साथरोग असल्यामुळे एका जनावरापासून दुसऱ्याला लवकर संक्रमित करतो. त्यामुळे लागण झालेल्या सर्व बैलांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून, इतर पशूंना कोरड्या व स्वच्छ ठिकाणी ठेवण्याच्या सूचना पशुपालकांना देण्यात आल्या आहेत. गोठे स्वच्छ असल्यास तेथे डास व गोचीड फारसे फिरकत नाहीत. त्यामुळे इतर पशूंना लागण होण्यापासून वाचवता येते, असे संबंधितांचे म्हणणे आहे. दरम्यान, लम्पी स्कीन डिसीज मेळघाटात पोहोचल्याचे कळताच येथील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके व त्यांचे सहकारी डॉ. जिरापुरे यांनी लगेच जिल्हाभरातील सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून गावा-गावांतील गोठे स्वच्छ करुन घेण्यासह जनावरांची योग्य निगा राखण्याच्या दृष्टीने पशुपालकांचे जनजागरण करण्यास सांगितले आहे.

लम्पी स्किन डिसीजची सुरुवात भारतात सर्वांत प्रथम २०१९ मध्ये ओडिशा राज्यातून झाली होती. लंपी स्कीन या आजाराचा प्रसार सुरुवातीला पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यात झाला. आता मात्र महाराष्ट्रातदेखील या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत असून अमरावती जिल्ह्याच्या आदिवासीबहुल मेळघाटात तो दाखल झाला आहे. लागण झालेल्यांपैकी दोन पशूंचे रक्तनमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, असे सांगून लक्षणावरुन उपचार सुरु केल्याचेही डॉ सोळंके यांनी स्पष्ट केले आहे.

व्हायरस रौद् रुप धारण करण्याची शक्यता
झिल्पी गावातील ३६ तर पाडीदममधील १९ अशा ५५ जनावरांना लम्पी स्कीन डिसिजने संक्रमित केले आहे. सध्या कोणत्याही प्राण्याचा जीव गेल्याची माहिती नाही. मात्र झिल्पी गावातील दोन बैल या व्हायरसमुळे दगावल्याची चर्चा आहे. मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यामध्ये मोठ्या संख्येत पाळीव प्राणी आहेत. त्यामुळे वेळीच पावले न उचलली गेल्यास भविष्यात हा व्हायरस रौद्र रुप धारण करुन अधिक हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मेळघाटात प्रत्येक गावात लसीकरण सुरु
लम्पी व्हायरसला अनुसरुन प्रत्येक गावात लसीकरण सुरु असून, या व्हायरसशी संबंधीत लक्षणे दिसून आल्यास तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती द्यावी.या व्हायरसचे संक्रमण डास, गोचीड अशा कीटकांपासून होते. दरम्यान, धारणी पशुवैद्यकीय दवाखान्यात फवारणीकरिता औषध उपलब्ध असून, ते घेऊन जाणे व फवारणी करणे गरजेचे आहे. या व्हायरसचे मनुष्य जातीवर संक्रमण होत नाही तरी खबरदारी घेण्याची गरज आहे. - डॉ एम. जे. आळे, पशुसंवर्धन अधिकारी, धारणी.

बातम्या आणखी आहेत...