आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंगणक व मोबाइलच्या युगातही शहरात 56 पत्र पेट्या अस्तित्त्वात असून, त्यात दररोज पत्रेही टाकली जातात. यात बहुतांश पत्रे ही शासकीय असतात, हा भाग निराळा. सुमारे एका दशकापूर्वी नातेवाइक, मित्रांना संदेश पाठवण्यासोबतच ख्याली, खुशाली कळवण्याचे प्रमुख माध्यम हे पत्र हेच होते. पत्र पाठवले की, त्याच्या उत्तराचीही लोक आतुरतेने वाट बघत बसायचे.
सध्या मोबाइलद्वारे थेट विदेशात बोलता येते, व्हाॅट्सअॅप, ट्विटरद्वारे संदेश देता येतो. संगणकाद्वारे ई-मेल, फेसबुकच्या माध्यमातून केवळ काही सेकंदात संदेश वाचता येतो. त्यामुळेच पत्र पाठवण्याची कोणालाही आवश्यकता राहिली नाही. संदेशवहनातील क्रांतीमुळे पत्र पाठविण्याची पद्धत जवळ-जवळ संपुष्टात आली आहे. असे असताना शहरात 56 पत्र पेट्या अस्तित्त्वात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
या पत्र पेट्या दिवसातून दोनदा सकाळी ७ व दुपारी ३ वाजता उघडून त्यातील पत्रे डाक विभागाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवण्यासाठी गोळा केली जातात. नंतर दळणवळणाच्या विविध माध्यमांद्वारे ती संबंधित पत्त्यावर पाठवली जातात. शहरात दिवसभरात शासकीय तसेच इतर अशी एकूण ५ हजारावर पत्रे पाठवली जात आहेत. प्रत्येक डाक कार्यालयापुढे एक पत्रपेटी ठेवण्यात आली आहे. त्यातून ही पत्र डाक विभागाचे वाहन ठराविक वेळेत गोळा करत असते.
दिवाळी, रक्षाबंधनाला स्पीड पोस्टचा मोठया प्रमाणात वापर होतो. इतर वेळी मात्र सर्वसामान्य फारसे पत्र पाठवत नाहीत. शासकीय पत्रे वगळता सध्या पत्र पाठवणाऱ्यांच्या संख्येत आधीच्या तुलनेत मोठया प्रमाणात घट झाल्याची माहिती डाक विभागाद्वारे देण्यात आली.
टपाल विभागही कात टाकत आहे
सध्या बहुतेकांकडे स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे संदेश पोहोचवण्याचे काम पत्राच्या तुलनेत वेगाने होते. संगणक व मोबाइलच्या युगात डाक विभागानेही ई-पोस्ट, स्पीड पोस्ट, बिझनेस पोस्ट, लॉजिस्टिक पोस्ट सारखी ई-प्रणाली सुरू केली आहे. काळानुसार टपाल विभागही कात टाकत आहे. नवनवीन सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.
-डाॅ. वसुंधरा गुल्हाने, अधीक्षक, डाक विभाग.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.