आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:चोरट्याकडून 6 दुचाकी जप्त; अन्य एक फरार

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्या ताब्यातून सहा दुचाकी जप्त केल्यात. ही कारवाई एलसीबीच्या पोलिसांनी रविवारी रात्री केली.अनिल उर्फ सोनू साहेबराव पारिसे (३७, रा. वासनी खुर्द, ता. अचलपूर, जि. अमरावती) असे दुचाकी चोराचे नाव आहे. याचवेळी मिलिंद संतोष वानखडे (३२, रा. बऱ्हाणपूर तळवेल, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती) हा पसार झाला असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास तातडीने करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार ४ सप्टेंबरला एलसीबीचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात एपीआय रामेश्वर धोंडगे, पीएसआय मुलचंद भांबुरकर यांचे पथक अचलपूर उपविभाग हद्दीत पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान अनिल पारिसे व मिलिंद वानखडे यांच्याकडे चोरीच्या दुचाकी असून, ते कमी रकमेत दुचाकी विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत आहेत.

तसेच ते वासनी खुर्द गावाच्या बस स्टॉपजवळील जंगल परिसरात बसून आहेत, अशी माहिती मिळाली. यावरून एलसीबीच्या पथकाने वासनी खुर्द गावाजवळ जाऊन सापळा रचून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न केले असता, पोलिसांच्या हाती अनिल पारिसे हा लागला, तर मिलिंद वानखडे हा जंगलाच्या दिशेने पळून गेला. पोलिसांनी अनिल पारिसेची कसून चौकशी करून, त्याच्या ताब्यातून सुमारे ३ लाख रुपये किमतीच्या ६ दुचाकी जप्त केल्या. सदरच्या दुचाकी आरोपींनी चांदूर बाजार, शिरजगाव, अचलपूर, अंजनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे सांगितले आहे. दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वी दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात एपीआय रामेश्वर धोंडगे, पीएसआय मुलचंद भांबुरकर, एएसआय दीपक उईके, युवराज मानमोठे, मंगेश लकडे, स्वप्निल तंवर, नितीन कळमकर, सायबरचे सागर धापड यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...