आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुष्यवध:सदोष मनुष्यवध प्रकरणी एकास 6 महिने कारावास ; वडाळी येथे 31 मे 2018 रोजी घडली होती घटना

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सदोष मनुष्यवधप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र एम. जोशी यांच्या न्यायालयाने आरोपीस मंगळवारी ६ महिने कारावास, ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना ३१ मे २०१८ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील वडाळी येथे घडली होती. आकाश रामजी बागडे (२३) रा. परिहारपुरा, वडाळी असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, वडाळीतील आझाद चौक येथील रहिवासी रुक्मिणी प्रधान ह्या पती श्रीकृष्ण यांच्यासह जेवन आटोपल्यावर घराबाहेर उभ्या होत्या. यावेळी आकाश बागडे हा परिसरात हातामध्ये काठी घेऊन गोंधळ घालत होता. त्याने एकासोबत कुत्र्याच्या कारणावरून वादसुद्धा घातला. त्यानंतर श्रीकृष्ण प्रधान हे आपल्या काही मित्रांसह आझाद चौकात पुलावर बसले होते. त्याचवेळी आकाश हा काठी घेऊन तेथे आला. त्याने श्रीकृष्ण प्रधान यांना शिवीगाळ करून त्यांना वीट फेकून मारली. वीट डोक्यावर लागल्याने श्रीकृष्ण प्रधान हे खाली पडले. त्यांना तातडीने घरी नेण्यात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आकाशविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. तपासाअंती तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणात न्या. रवींद्र एम. जोशी यांच्या न्यायालयात १० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. सदर प्रकरणात आरोपी आकाशला सदोष मनुष्यवधप्रकरणी दोषी ठरवित ६ महिने कारावास, ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. नुकसानभरपाई म्हणून आरोपीकडून ४० हजार रुपये तातडीने वसूल करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता दिलीप दे. तिवारी यांनी यशस्वी युक्तीवाद केला.

बातम्या आणखी आहेत...