आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:67 लाखांच्या ॲल्युमिनियमची चालकाने लावली विल्हेवाट; मोर्शी पोलिसांत तक्रार

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील अहमदाबाद वरुन अमरावती मार्गे मध्य प्रदेशातील भिलाईला जाणाऱ्या एका ट्रकचालकाने जिल्ह्यातील मोर्शी जवळ ट्रक सोडून पळ काढला आहे. तत्पूर्वी ट्रकमधील सुमारे ६७.७१ लाखांच्या अॅल्युमिनियमची परस्परच विल्हेवाट लावली. अशी तक्रार मोर्शी पोलिसांत बुधवारी (दि. २३) रात्री दाखल झाली आहे. दरम्यान, ‘एलसीबी’ने तातडीने तपास सुरू करुन ट्रकमधून गेलेले काही अॅल्युमिनियम गुरुवारी (दि. २४) जप्त केले असून, आरोपी रडारवर आले आहेत, त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

रोशन भोलाराम सचदेव (रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) असे पसार झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. या प्रकरणी रायपूर येथील व्यावसायिक विपीन विरचंद जैन (५४) यांनी मोर्शी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विपीन जैन यांनी ट्रक (क्रमांक सीजी ०४ एलएस ९२६९) मध्ये अहमदाबाद येथील आर. के. इंडस्ट्रीजमधून अॅल्युमियम भरुन मध्य प्रदेशातील भिलाईच्या सार्थक मेटलमध्ये आणण्यासाठी पाठवला होता. या ट्रकचा चालक रोशन सचदेव होता. तसेच त्याच्यासोबत त्याच्याच परिचयाचा क्लिनर होता. दरम्यान, हा ट्रक १६ नोव्हेंबरला सुमारे ३०० क्विंटल अॅल्युमिनियम घेऊन भिलाईला येण्यासाठी निघाला.

चार दिवस ट्रकमध्ये असलेले जीपीएस सुरू होते. त्यामुळे जैन यांना ट्रक ‘ट्रॅक’ व्हायचा मात्र २० नोव्हेंबरला ट्रक उभा असून, जीपीएस बंद असल्याचे त्यांना लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शोधाशोध केली आणि ते बुधवारी मोर्शी पोलिसांत पोहोचले. मोर्शी परिसरात शोध घेतला असता भाईपूर गावाजवळ ट्रक उभा होता मात्र ट्रकमध्ये अॅल्युमिनीयमचा एक तुकडाही नव्हता. त्यामुळे त्यांनी मोर्शी पोलिस ठाणे गाठून ट्रकचालक रोशन सचदेव यानेच परस्पर ही अॅल्युमिनियमची विल्हेवाट लावून फसवणूक केल्याची तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी सचदेवविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला.

दरम्यान, बुधवारी रात्रीपासून ‘एलसीबी’चे पीआय तपन काेल्हे व त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, मोर्शी परिसरातच पोलिसांना ट्रकमधील काही अॅल्युमिनीयम सापडले असून, ते जप्त केले आहे.

ट्रकचालक सचदेवविरुद्ध यापूर्वी गुन्हा
या प्रकरणातील ट्रकचालक रोशन सचदेव याच्याविरुद्ध यापूर्वी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती ‘एलसीबी’च्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, रोशन सचदेव याने अमरावती मधील एका व्यक्तीच्या माध्यमातून ट्रकमधील अॅल्युमिनियमची विल्हेवाट लावली असून, पोलिस त्या व्यक्तीसह रोशन सचदेवच्या मागावर आहेत.

बातम्या आणखी आहेत...