आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळीचा फटका:दोन दिवसांच्या अवकाळी पावसामुळे विभागात साडे 7 हजार शेतकरी बाधित; निम्मे पंचनामे पूर्ण

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
लवकरच संपवणार प्रक्रिया - Divya Marathi
लवकरच संपवणार प्रक्रिया

गेल्या दोन दिवसांत झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे अमरावती विभागातील 242 गावांतील 7 हजार 596 शेतकऱ्यांना फटका बसला. या सर्वांना तातडीने शासकीय मदत पोहोचविली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, सोमवारी येथे दिली.

अमरावती जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्र्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाता माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसामुळे बरेच नुकसान झाले. अमरावतीसह अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील 242 गावांना अवकाळी पाऊस व गारपीटचा फटका बसला. त्यामुळे 5 हजार 596 शेतकऱ्यांच्या सुमारे 7 हजार 400 हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना मदत पोहोचवावी, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे गहू, मका, हरभरा, मिरचीसह संत्रा, आंबा व लिंबू आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने 3 हजार 243 हेक्टर शेतजमीनीचे पंचनामे पूर्ण केले असून उर्वरित 4 हजार 157 हेक्टरचे पंचनामेही लवकरच पूर्ण केले जातील. त्यानंतर शासकीय धोरणानुसार त्या सर्वांना एसडीआरएफमार्फत मदत पुरविली जाणार असल्याचेही पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांत या भागात तब्बल तीन वेळा नैसर्गिक आपत्ती ओढवली. आधीच्या दोन्ही वेळी शासनाने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना मदत पुरविली आहे. आताही तशीच मदत पुरविली जाईल.

पारस येथील मृतांना मदत

नैसर्गिक आपत्तीच्या या दुष्टचक्रात अकोला जिल्ह्यातील पारस येथील सात जणांना जीव गमवावा लागला. पावसापासून बचाव करण्यासाठी थांबलेल्या ठिकाणी एक भले मोठे झाड कोसळल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये 35 जण जखमी झाले असून त्यांच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाणार आहे. शिवाय जे नागरिक या दुर्घटनेत मृत झाले, त्यांच्या कुटुंबीयांनाही सरकारी मदत पोहोचविली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.