आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत ग्रा.पं.साठी 75 टक्के मतदानाचा अंदाज:पहिल्या 8 तासांत 62.44 टक्के मतदारांनी बजावला हक्क

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या 8 तासांत अर्थात दुपारी साडे तीन वाजेपर्यंत 62.44 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अजून दोन तास शिल्लक असल्याने शेवटची आकडेवारी 75 टक्क्यांवर पोचणार असल्याचा अंदाज यंत्रणेने व्यक्त केला आहे. मतदानादरम्यान जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नसून इव्हीएममध्येही कोणताच तांत्रिक दोष निर्माण झाला नसल्याचे निवडणूक यंत्रणेचे म्हणणे आहे.

251 सरपंचांसाठी 1,657 आणि, सदस्यांच्या 1684 जागांसाठी 3858 उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. या सर्वांचे भाग्य आजच्या मतदानामुळ‌े इव्हीएममध्ये बंद झाले आहे. आगामी 20 डिसेंबरच्या मतमोजणीअंती ते स्पष्ट होणार आहे. सदर निवडणुकीसाठी 3 लाख 48 हजार 631 मतदार मतदान करणार होते. त्यापैकी 75 टक्के मतदार शेवटच्या क्षणापर्यंत आपला हक्क बजावतील, असा यंत्रणेचा अंदाज आहे. त्यासाठी जिल्हाभरात 817 मतदान केंद्र उघडण्यात आले होते.

पाच गावांची निवडणूक अविरोध झाल्याने जिल्ह्यातील 252 ग्रामपंचायतींसाठी आज, रविवार, 18 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी मतदानाची वेळ होती. ठरल्यानुसार सकाळी 7.30 च्या ठोक्याला मतदान सुरु झाले. थंडीचा काळ असल्याने पहिल्या दोन तासांत मतदानाचा वेग हळू होता. त्यामुळे 9.30 वाजेपर्यंत केवळ 9.54 टक्के मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यानंतर मात्र गर्दी वाढत जाऊन अनेकांनी मतदान केले. त्यामुळे दुपारी साडे तीन वाजता ही संख्या वाढून 62.44 वर पोचली. मतदानासाठी परिसरातील शासकीय व निमशासकीय नोकरदारांना पगारी सुटी घोषित करण्यात आली होती.

मतदान असल्यामुळे गाव पातळीवरील आठवडी बाजार, मद्यविक्री व कत्तलखाने बंद ठेवण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर व निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आणि त्यांची संपूर्ण चमू या कार्यावर लक्ष ठेऊन होती. मतदान केंद्र परिसरात जमावबंदीचे कलम 144देखील लागू करण्यात आले होते. संवेदनशील मतदान केंद्रांसाठी अतिरिक्त पोलिस कुमकही तैनात ठेवण्यात आली होती. जिल्हा परिषदेची रिहर्सल समजली जाणारी ही निवडणूक आहे. सरपंचांची निवडणूक थेट होत असल्यामुळे या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी सहभाग घेतला आहे.

पाच गावातील मतदान टळले

जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींपैकी चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी संगम, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चिखली वैद्य, वरुड तालुक्यातील डवरगाव, मोर्शी तालुक्यातील बेलोना आणि दर्यापुर तालुक्यातील सांगवा बुजुर्ग या पाच गावांतील सरपंच व सदस्य अविरोध विजयी झाल्याने त्याठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक घेण्याची वेळ ओढवली नाही. त्यामुळे निवडणूक होत असली तरी त्या गावांत आज, रविवारी मतदान घेण्यात आले नाही.

बातम्या आणखी आहेत...