आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:7871 जलस्रोतांचे तपासणी अहवाल रखडले, ज्यासाठी नमुने घेतले, त्या उद्देशालाच फाटा; तपासणी अहवालाची नागरिकांना प्रतीक्षा

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदाच महिलांच्या सहयोगातून जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींमध्ये ७ हजार ८७१ पाणी स्राेतांचे नमुने घेण्यात आले, परंतु आज ४० दिवस लोटूनही या नमुना तपासणीचे अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाले नाही. ज्या उद्देशाकरिता नमुने घेण्यात आले त्या उद्देशालाच फाटा दिल्याचे यामध्ये निदर्शनास येत आहे. त्यामुळे हे पाणी वापरण्यास योग्य की अयोग्य असा संभ्रम आता गावांमध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे या नमुन्यांची तपासणी अहवाल कधी येणार याची प्रतीक्षा आता नागरिकांनाही लागलेली आहे.

जलजीवन मिशन अभियानांतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमात गावातील प्रशिक्षित महिलांच्या माध्यमातून पाणी स्रोतांचे नमुने गोळा करून तपासणी करण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील ८४० ग्रा. पं.त एकाच दिवशी ७८७१ पाणी स्रोतांच्या नमुन्यांची तपासणीची मोहीम जिल्हा परिषदेने यशस्वीरित्या राबवली.

काही ठिकाणी सीईओ अविश्यांत पंडा, तर काही ठिकाणी उपमुख्य कार्यकारी श्रीराम कुलकर्णी यांनी गावांमध्ये जाऊन महिलांच्या सहकार्याने जलस्रोतांची तपासणी केली. जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मार्फत २० व २१ मार्च रोजी पाणी स्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. याचा अहवाल २२ मार्च रोजी प्राप्त होणार होता, परंतु आज ४० दिवस लोटूनही या नमुन्यांचा अहवाल अद्यापही पोहोचलेला नाही. गावस्तरावर पहिल्यांदाच महिलांच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाची चर्चा होते. परंतु ज्या उद्देशाने हे अभियान राबवले तो उद्देश खऱ्या अर्थाने सफल होत नसल्याने दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...