आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंजनगाव सुर्जी पासून जवळच असलेल्या लखाड गावात एक व्यक्ती गावठी पिस्तुलांची विक्री करतो, अशी माहिती अंजनगाव सुर्जी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी (दि. ३) उशिरा रात्री लखाड येथे धाड टाकली. यावेळी आरोपीच्या घरातून तीन गावठी पिस्तुल व आठ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. तसेच पिस्तुल बाळगणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. ही पिस्तुल त्याने मध्य प्रदेशातून आणल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले.
मोहम्मद नवेद उर्फ गुड्डू अब्दुल सलीम (३०, रा. लखाड) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मोहम्मद नवेद हा मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेशातून पिस्तुल व जिवंत काडतूस आणतो व विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, त्याने दोन दिवसांपूर्वी पिस्तुल आणल्याचे समजताच पोलिसांनी शनिवारी रात्री त्याच्या घरी धाड टाकून झाडाझडती घेतली. त्यावेळी घरातील स्वयंपाक खोलीत शेगडीच्या ओट्याखाली तीन गावठी पिस्तुल व ८ जिवंत काडतूस (९ एम.एम.) मिळून आले. पोलिसांनी हे अवैध पिस्तुल व जिवंत काडतुसं जप्त करुन त्याला अटक केली.
मोहम्मद नवेद याचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. तो त्या व्यवसायासोबतच पिस्तुलांची विक्री करत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले. मागील सहा महिन्यांपासून पोलिसांना त्याचा शोध होता मात्र, तो पोलिसांना गवसत नव्हता. दरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेल्या तीनपैकी दोन पिस्तुल नव्याकोऱ्या आहेत तर एक जुनी आहे. त्याने यापूर्वी परिसरात व अन्य ठिकाणी कोणाकोणाला अवैध पिस्तुलची विक्री केली, या पिस्तुल कोणासाठी बोलावल्या होत्या, अशी सखोल माहिती पोलिस घेत आहेत. ही कारवाई अंजनगावचे एसडीपीओ सचिंद्र शिंदे, ठाणेदार दिपक वानखडे, एपीआय उल्हास राठोड, विजय शेवतकर, जयसिंग चव्हाण, विशाल थोरात, शुभम मारकंड, देवानंद पालवे, हर्षा यादव यांनी केली आहे. रविवारी (दि. ४) मोहम्मद नवेदला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.