आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ सिनेट निवडणूक:दोन दिवसात 8 जणांची माघार; अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट, विद्वत आणि विविध अभ्यासमंडळाच्या निवडणुकीतून गेल्या दोन दिवसांत केवळ 8 जणांनी माघार घेतली. दरम्यान माघार घेण्याचा शेवटचा दिवस 4 नोव्हेंबरला असल्याने आता केवळ एकच दिवस उरला आहे.

विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणींची निवडणूक आगामी 20 नोव्हेंबर रोजी होत आहे. त्यासाठी गेल्या 27 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी 28 ऑक्टोबरला सर्व अर्जांची छाननी करुन त्यातील वैध व विधीग्राह्य नसलेल्या अर्जांची यादी घोषित करण्यात आली. त्यानंतर माघारीची प्रक्रिया सुरू झाली असून 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

उद्या होणार स्पष्टता...

दरम्यान गेल्या दोन दिवसांत केवळ आठ जणांनी माघार घेतली असून नेमक्या कोणत्या संवर्गातील उमेदवारांनी माघार घेतली, हे विद्यापीठ प्रशासनाकडून कळू शकले नाही. विद्यापीठ प्रशासनाच्या मते 4 नोव्हेंबरलाच त्याबाबतची स्पष्टता होणार आहे.

दरम्यान अधीसभेवर निवडून द्यावयाच्या दहा प्राचार्यांसाठी 28 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी एस.सी. वर्गवारीतील 3, डी.टी./एन.टी., महिला आणि ओबीसी वर्गवारीतून प्रत्येकी दोन 2 तसेच सर्वसाधारण वर्गवारीतून 11 अशाप्रकारे 20 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून 8 विधीग्राह्य नाहीत, असे विद्यापीठाने घोषित केले आहे.

10 उमेदवारांचे अर्ज विधीवत नव्हते

विविध शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघातून सिनेटवर सहा प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. त्यासाठी 24 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एस.टी. वर्गवारी व महिला वर्गवारीतून प्रत्येकी दोन आणि सर्वसाधारण वर्गवारीतून 10 अशाप्रकारे 14 जणांचे अर्ज वैध ठरले. इतर 10 उमेदवारांचे अर्ज विधीवत नव्हते, असे विद्यापीठ प्रशासनाने घोषित केले आहे.

मतदारसंघासाठी 58 उमेदवारांचे अर्ज प्राप्त

दहा महाविद्यालयीन अध्यापक मतदारसंघासाठी एकूण 58 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी डी.टी./ एन.टी. वर्गवारीतील 5, ओबीसी वर्गवारीतील 4, एस.सी. व महिला वर्गवारीतून प्रत्येकी 3, एस.टी. वर्गवारीतील 2 तर सर्वसाधारण वर्गवारीतून 26 अशाप्रकारे 43 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या मतदारसंघातील विधीग्राह्य नसणाऱ्या अर्जांची संख्या 15 आहे.

चौघांची उमेदवारी विधीग्राह्य नाही

तीन सदस्य निवडून द्यावयाच्या विद्यापीठ अध्यापक मतदारसंघासाठी 9 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी एस.टी. वर्गवारीतून 1 तर सर्वसाधारण व महिला वर्गवारीतून प्रत्येकी 2 अशाप्रकारे एकूण 5 अर्ज वैध ठरले. इतर चौघांची उमेदवारी विधीग्राह्य नसल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. तर तिकडे दहा नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघासाठी सर्वाधिक 92 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 45 अर्ज विधीग्राह्य नसून 47 उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. त्यामध्ये एस.सी. व महिला वर्गवारीतून प्रत्येकी 6, डी.टी./एन.टी. वर्गवारीतून 5, ओ.बी.सी. वर्गवारीतून 4, एस.टी. वर्गवारीतून 3 तर सर्वसाधारण वर्गवारीतील 23 उमेदवारांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...