आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 रुग्णांवर उपचार सुरू:बोरगाव धांदे येथे 80 ग्रामस्थांना डायरियासदृश आजाराची लागण

धामणगाव रेल्वेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बोरगाव धांदे येथील सुमारे ८० ग्रामस्थांमध्ये डायरियासदृश आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. एकाच दिवशी गावातील ८० जणांना मळमळ, उलटीचा त्रास सुरू झाला होता. या प्रकाराने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही लागण दूषित पाण्यामुळे झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून २५ जणांवर जि. प. शाळेच्या खोलीत औषधोपचार सुरू आहेत.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव धांदे येथे दुषित पाण्यामुळे जवळपास ८० ग्रामस्थांना मळमळ, उलटी, पोट दुखणे आदी त्रास शुक्रवारी (दि. १६) सकाळपासून सुरू झाला. ही माहिती मिळताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. गुरुवारी गावातील ४-५ व्यक्तींना त्रास होत असल्याचे समोर आले. शुक्रवारी अचानक त्यात वाढ झाली असून ८० ग्रामस्थांना डायरिया सदृश आजाराची लक्षणे जाणवू लागली होती. दरम्यान, माहिती होताच धामणगाव रेल्वे तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी तात्काळ चमूसह बोरगांव धांदे येथे जाऊन संपूर्ण गावात प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप सुरू केले आहे.

दरम्यान, ८० पैकी २५ रुग्णांना अधिक त्रास होत असल्याने त्यांच्यावर गावातीलच जि. प. शाळेत एका खोलीत औषधोपचार सुरू करण्यात आले आहे. एकंदरीत सध्या परिस्थिती नियंत्रणात असून गावातील पाण्याचे नमुने पुन्हा परीक्षणासाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर या आजाराचे खरे कारण समोर येणार आहे.

परिस्थिती नियंत्रणात घटनेची माहिती मिळताच तात्काळ उपाययोजना राबवण्यात येत असून, संपूर्ण गावात प्रतिबंधात्मक औषधींचे वितरण आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू केले आहे. सध्या एकही रुग्ण गंभीर नसून २५ जणांवर शाळेत उपचार सुरू आहेत, तर उर्वरीत रुग्णांना औषधोपचार करुन त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून त्याचा अहवाल यायचा आहे. मात्र दुषित पाण्यामुळे लागण झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास येत आहे. - डॉ. हर्षल क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...