आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी, शिक्षकांच्या 38 मागण्या शासनदरबारी प्रलंबित:शालेय पोषण आहार, अतार्किक कामांविरुद्ध 8 ऑगस्टला शिक्षकांचे जि.प. वर धरणे

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांवर सोपविण्यात आलेल्या अतार्किक कामांविरुद्ध शिक्षकांनी एकजूट केली असून आगामी 8 ऑगस्टला जिल्हा परिषद मुख्यालयावर धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. जि.प. च्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सकाळी 11 वाजता हे आंदोलन सुरु होईल.

संघटनेच्या मते सरकार विद्यार्थी व शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून शालेय पोषण आहार व अन्य अतार्किक अशा माहितीसाठी शिक्षकांना वेठीस धरले जात आहे. दुसरीकडे राज्यातील शिक्षकांच्या रिक्त असणाऱ्या जागांचा विपरीत परिणामही अध्ययन-अध्यापनावर होत आहे. केंद्रप्रमुखांच्या 70 टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. त्यांचा अतिरिक्त प्रभार अनेक जिल्ह्यात मुख्याध्यापक, शिक्षकांकडे आहे.

त्याचाही प्रतिकुल परिणाम होत असून गुणवत्ता वाढीसाठी तो मोठा अडथळा आहे. शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांला गणवेश देण्याची घोषणा केली होती. परंतु ती हवेतच विरून गेली आहे. जुनी पेन्शन, शिक्षण सेवकांचे मानधन, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, बदली प्रक्रिया रेंगाळणे, वेतन तृटी, पदवीधर वेतनश्रेणी, पूर्वाश्रमीचे वस्तीशाळा शिक्षक अशा विविध मागण्यांची सोडवणूक करण्याच्यादृष्टीने शासन स्तरावर खूपच औदासिन्य आहे. या सर्व मुद्द्यांना धरुनच हे आंदोलन केले जाणार आहे.

गेली दोन वर्षे शिक्षकांनी कोरोना संकट काळात जीव धोक्यात घालून विविध कामे पार पाडली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे म्हणून शाळा लवकर सुरू करण्यासाठी स्वतःहून शिक्षक पुढे आले. विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षक अधिकाधिक मेहनत करत आहेत. मात्र विद्यार्थी व शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासनाची भूमिका नकारात्मक आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कर्तव्यभावनेने पुढाकार घ्यावा, असे अवाहन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, सरचिटणीस विजय कोंबे, प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर, न.पा.-मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत, महिला आघाडी प्रमुख वर्षा केनवडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...