आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांसाठी वाढीव मदतीची घोषणा:अतिवृष्टीग्रस्तासांठी 92 कोटी 89 लाख निधीची मागणी; 45 हजार 808 हेक्टर क्षेत्र बाधीत

अमरावती22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या खरीप हंगामात जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टीमुळे, खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी वाढीव मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार स्थानिक महसूल प्रशासनाने 33 टक्क्यांवरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 92 कोटी 89 लाख 20 हजार 728 रूपये एवढ्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे. याचा लाभ तालुक्यातील 45 हजार 808 हेक्टर वरील 39 हजार 577 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे.

महसूल व कृषी विभागाच्या एकत्रीत अंतिम पंचनाम्यानुसार तालुक्यातील 57 हजार 771 हेक्टर क्षेत्रापैकी 45 हजार 808 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्क्याच्यांवर नुकसान झाले आहे. यात चांदूरबाजार, बेलोरा, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगांव कसबा, करजगांव या पाच महसूल मंडळांत अतिवृष्टीमुळे तर आसेगाव व तळेगाव मोहना या दोन महसूल मंडळात सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. या महसूल मंडळातील नुकसानग्रस्त पिकांमध्ये खरीपातील कोरडवाहू पिके, फळपिके, जिरायती पिके (फळबाग वगळता) इत्यादींचा समावेश आहे. तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त पाच महसूल मंडळातील 38 हजार 252 हेक्टर पैकी, 31 हजार 545 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्याचे वर नुकसान झाले आहे.

यामध्ये 20 हजार 148 हेक्टर जिरायती, 11 हजार 338 हेक्टर फळपिके तर 59 हेक्टर बागायती पिकांचा समावेश आहे. अतिवृष्टीग्रस्त चांदूरबाजार, बेलोरा, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा, करंजगाव या पाच महसूल मंडळांतील 29 हजार 215 शेतकऱ्यांची पिके अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झाली आहेत. या पाच मंडळातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांसाठी 68 कोटी, 37 लाख, 98 हजार, 416 रूपये इतक्या निधीची शासनाकडे मागणी केली आहे. तर दुसरीकडे सततच्या पावसाने तालुक्यातील आसेगाव व तळेगाव मोहना या दोन महसुली मंडळात पिकांची हानी झाली आहे. दोन्ही मंडळात एकूण 19 हजार 519 हेक्टर क्षेत्रापैकी 14 हजार 262 हेक्टर क्षेत्र सततच्या पावसाने नुकसानग्रस्त झाले आहे. यात 11 हजार 976 हेक्टर जिरायती, 2 हजार 267 हेक्टर फळपिके, 28 हेक्टर बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. या दोन महसुली मंडळातील नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी 24 कोटी 51 लाख 22 हजार 332 रूपयांची मागणी करण्यात आली आहे.

शासनाच्या सुधारीत वाढीव मदतीनुसार जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी 13 हजार 600 रूपये मदत देण्यात येणार आहे. तसेच फळपिकांसाठी हेक्टरी 36 हजार रुपये तर इतर बागायती पिकांसाठी हेक्टरी 27 हजार रूपये इतकी मदत देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...