आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा:चांदूर बाजार तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 92.89 कोटींची मागणी

चांदूर बाजार22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या खरीप हंगामात जुलै आणि आॅगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे, खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी वाढीव मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार स्थानिक महसूल प्रशासनाने ३३ टक्क्यांवरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ९२ कोटी ८९ लाख २० हजार ७२८ रूपये एवढ्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे. याचा लाभ तालुक्यातील ४५ हजार ८०८ हेक्टर वरील ३९ हजार ५७७ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे.

महसूल व कृषी विभागाच्या एकत्रीत अंतिम पंचनाम्यानुसार तालुक्यातील ५७ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रापैकी ४५ हजार ८०८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. यात चांदूरबाजार, बेलोरा, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा, करजगांव या पाच महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे तर आसेगाव व तळेगाव मोहना या दोन महसूल मंडळात सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. या महसूल मंडळातील नुकसानग्रस्त पिकांमध्ये खरिपातील कोरडवाहू पिके, फळपिके, जिरायती पिके (फळबाग वगळता) इत्यादींचा समावेश आहे.

तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त पाच महसूल मंडळातील ३८ हजार २५२ हेक्टर पैकी, ३१ हजार ५४५ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्याचे वर नुकसान झाले आहे. यामध्ये २० हजार १४८ हेक्टर जिरायती, ११ हजार ३३८ हेक्टर फळपिके तर ५९ हेक्टर बागायती पिकांचा समावेश आहे. अतिवृष्टीग्रस्त चांदूरबाजार, बेलोरा, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा, करंजगाव या पाच महसूल मंडळातील २९ हजार २१५ शेतकऱ्यांची पिके अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झाली आहेत. या पाच मंडळातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ६८ कोटी, ३७ लाख, ९८ हजार, ४१६ रूपये इतक्या निधीची शासनाकडे मागणी केली आहे. तर दुसरीकडे सततच्या पावसाने तालुक्यातील आसेगाव व तळेगाव मोहना या दोन महसुली मंडळात पिकांची हानी झाली आहे. दोन्ही मंडळात एकूण १९ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रापैकी १४ हजार २६२ हेक्टर क्षेत्र सततच्या पावसाने नुकसानग्रस्त झाले आहे. यात ११ हजार ९६७ हेक्टर जिरायती, २ हजार २६७ हेक्टर फळपिके, २८ हेक्टर बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. या दोन महसुली मंडळातील नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी २४ कोटी ५१ लाख २२ हजार ३३२ रुपयांची मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या सुधारीत वाढीव मदतीनुसार जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी १३ हजार ६०० रूपये मदत देण्यात येणार आहे. तसेच फळ-पिकांसाठी हेक्टरी ३६ हजार रुपये तर इतर बागायती पिकांसाठी हेक्टरी २७ हजार रूपये इतकी मदत देण्यात येणार आहे. ही आर्थिक मदत पीकनिहाय ३३ टक्क्यांवरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्या-त्या पिकांंचे नुकसानग्रस्त क्षेत्रानुसार ३ हेक्टर मर्यादेपर्यंतच मिळणार आहे. दरम्यान निधी प्राप्त होताच वरिष्ठांच्या आदेशानुसार ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात येईल, असे तहसीलदार धीरज स्थुल यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...