आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचप्रकरणी 1 वर्षाची शिक्षा:वैद्यकीय अधिकाऱ्याला १६ वर्षांपूर्वी मागितली अडीच हजारांची लाच

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेतनवाढीचे ४० हजार रुपये फरक काढून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच मागणी करून त्यापैकी २५०० रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या निवृत्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला एक वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश (क्रमांक ३) आर. व्ही. ताम्हणेकर यांच्या न्यायालयाने मंगळवारी (दि. ३०) हा निर्णय दिला.

विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुरेश रामकृष्ण ठाकरे (७२) असे शिक्षा झालेल्या तत्कालीन डीएचओचे नाव आहे. २० फेब्रुवारी २००६ रोजी तत्कालीन डीएचओ ठाकरे यांच्यावर एसीबीने सापळा रचला होता. या प्रकरणातील फिर्यादी डॉ. अनिल झामरकर होते. डॉ. झामरकर हे त्यावेळी धारणी येथे कार्यरत होते. त्यांनी मॅटकडे वेतनवाढीबाबत केस दाखल केली होती.

त्यात त्यांना वेतनवाढ मिळाली. दरम्यान, चार वर्षांच्या वेतनवाढीचे ४० हजार रुपये फरक द्यावा, असा अर्ज त्यांनी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ठाकरे यांच्याकडे दिला. त्यासाठी ठाकरे यांनी १० हजार रुपये लाच मागितली. पैकी २ फेब्रुवारी २००६ रोजी २५०० रुपये स्वीकारले. बिल निघण्यापूर्वी देय लाचेचे २५०० रुपये २० फेब्रुवारी रोजी ठाकरे स्वीकारणार होते. त्यापूर्वी झामरकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्याच दिवशी स्वत:च्या दालनात (जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि.प. अमरावती) ठाकरे यांनी २५०० रुपये स्वीकारले. ती लाचेची रक्कम जप्त करून त्यावेळी ठाकरेंविरोधात गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. ही कारवाई एसीबीचे तत्कालीन डीवायएसपी किरण धोटे यांनी केली होती. याप्रकरणी तपास पूर्ण करुन ‘एसीबी’ने २००८ मध्ये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. सुनील देशमुख यांनी आठ साक्षीदार तपासले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून डॉ. सुरेश ठाकरे यांना भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये शिक्षा ठोठावली. शासकीय अभियोक्ता सुनील देशमुख यांनी युक्तिवाद केला.

बातम्या आणखी आहेत...