आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:थंडीची चाहूल; उबदार कपड्यांचे मार्केट गरम; जॅकेट, कानटोपी घेण्यावर नागरिकांचा भर

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळा संपला असून, हवेत गारवा वाढू लागला आहे. गुलाबी थंडीची चाहूल लागताच नागरिकांची पावले आपसूकच लोकरीच्या कपड्यांच्या दुकानाकडे वळू लागली आहेत. दरम्यान, शहरातील नागरिकांची मागणी पाहता, काही विक्रेत्यांनी रस्त्यालगत दुकाने थाटली असून, तेथेही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

हिवाळ्यात थंडीपासून बचाव म्हणून उबदार कपड्यांना नागरिकांची पसंती असते. थंडीची चाहूल लागताच परप्रांतीय गरम कपडे विक्रेते शहरात दाखल झाले असून, शहरात बाजारपेठेसह रस्त्यालगत गरम कपड्याची दुकाने थाटली असून, येथे नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

थंडीपासून बचाव व्हावा म्हणून स्वेटरसह जॅकेट, कानटोपी, हातमोजे घेण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे, तर युवावर्ग हा थंडीपासून संरक्षाबरोबरच फॅशनसाठी गरम कपड्यांना पसंती देत आहे. सकाळी फिरायला जाताना स्वेटर, जॅकेट, विविध प्रकारच्या कानटोप्या, मफलर वापरताना दिसून येत आहेत. महिलावर्गदेखील स्वेटरसह स्कार्फचा वापर करताना दिसून येत आहेत. यंदा कोरोनामुळे मॅचिंग मास्कही बाजारात आहेत.

माकड टोपी, कानटोपी, हातमोज्यांना मागणी
थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्राहकांकडून माकड टोपी, कानटोपीला अधिक पसंती मिळत आहे. त्याच बरोबर लोकरीसह लेदरच्या हातमोज्यांनाही मागणी वाढली आहे. महिलांमध्ये विविध प्रकारच्या स्वेटरसह, स्कार्फ व विविध रंगी शालींची मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगीतले.

स्वेटर-टोपी मॅचिंगला युवावर्गाची पसंती
युवावर्ग थंडीसह फॅशनलाही महत्त्व देत असल्याने ते मॅचिंगला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. यासाेबतच टु-इन-वन जॅकेट, फुल बाह्याचे व स्लिव्हलेस जॅकेट, स्वेटर्स, बीन बाह्याचे स्वेटर्स, महिलांसाठी लोकरी कोट, लहान मुलांसाठी जॅकेट आदी प्रकारच्या कपड्यांना पसंती असल्याचे व्यावसायिकांनी सांगीतले.

रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये गर्दी
रस्त्यालगत थाटलेल्या दुकानात कमी किमतीत उबदार कपडे मिळत असल्याने या ठिकाणी नागरिकांची विशेषत: तरुणाईची गर्दी जास्त दिसत आहे. ऊबदार कपड्याच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...