आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 क्विंटल सोयाबीन जळून खाक:पिंपळगाव निपाणीत गंजीला आग; शेतकऱ्याने म्हटले -आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील नामदेव घवळे या शेतकऱ्याच्या शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागली. त्यामध्ये 40 क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले आहे. त्यामुळे त्यांचे अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या वर्षी मुळातच पाऊस एक महिना उशीरा आल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या. पदरमोड करीत, कर्ज काढून, उसणवार करीत अनेक शेतकऱ्यांनी डोळ्यात हिरवे स्वप्न रंगवत पेरणी केली. मात्र जुलै महिन्यापासून ते सोयाबीन काढणीच्या हंगामापर्यंत सतत बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची पाठ साेडली नाही. त्यामुळे हातात पिक येणार की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत होती.

संततधार पाऊस व अतिवृष्टीचया तारातही पिकाने कसातरी तग धरल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र कुठे निसर्गाच्या अवकृपेने, तर कुठे रसातळाला गेलेल्या माणसुकीने शेतकऱ्यांच्या भरघोस उत्पन्नाच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे घडला.

पिंपळगाव निपाणी येथील शेतकरी नामदेव घवळे यांचे माळेगाव शिवारात शेत असून त्यामध्ये त्यांनी तीन एकरमध्ये असलेले सोयाबीन कापून त्याची गंजी लावली होती. दरम्यान घटनेच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी या सोयाबीनच्या गंजीला आग लावली. त्यामध्ये संपूर्ण गंजी जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नामदेव घवळे यांच्यावर बँकेचे कर्ज आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले असल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या नुकसानाची दखल घेत शासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नामदेव घवळे यांनी केली.

आत्महत्येशिवाय पर्याय नाही; शेतकऱ्याची खंत

नामदेव घवळे यांनी सोयाबीन साेंगणीसाठी म्हणून तीन एकर शेतातील सोयाबीनची गंजी शेतातच लावून ठेवली होती. सोयाबीन काढणाऱ्या मजुरांच्या प्रतिक्षेत ती गंजी शेतात तशीच पडून होती. मात्र अज्ञात व्यक्तींना त्यांचे हे सुखही पहावले गेले नाही. त्यांनी या गंजीला आग लावली. त्यात संपूर्ण गंजीची राखरांगोळी झाली असून आता जगावे, तरी कसे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...