आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात १ ते १५ जुलैदरम्यान अतिसार नियंत्रणासाठी पंधरवडा राबवला जाणार असून, त्यात अतिसार असलेल्या सर्व बालकांना झिंक व ओआरएसचे नि:शुल्क वाटप केले जाणार आहे. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर आणणे हाच मुख्य उद्देश आहे. त्याचप्रमाणे, पाच वर्षांखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध व व्यवस्थापनासाठी पालकांचे समुपदेशन व अतिजोखमीची क्षेत्रे, तसेच दुर्बल घटकांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या आरोग्य आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना देण्यात आली. या पंधरवड्यात १ लाख ६३ हजार बालकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे दवाखाने अशा सर्व ठिकाणी ‘ओआरएस व झिंक कॉर्नर’ स्थापून त्याचे विनामूल्य वाटप होईल. त्याचप्रमाणे, आशा सेविकांच्या माध्यमातून गृह भेटी देऊन वाटप करण्यात येईल, तसेच ओआरएस तयार करण्याच्या पद्धती, हात धुण्याचे महत्व याबाबत माहितीही दिली जाईल. जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा व अतिसार नियंत्रण पंधरवड्याबाबत नियोजन बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवनात झाली. निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे, प्राथमिक शिक्षणाधिकारी स्मिता देशमुख, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. जयश्री नांदुरकर, डॉ. प्रशांत घोडाम उपस्थित होते.
कोविड लसीकरणासाठी शाळा स्तरावर प्रभावी नियोजनाचे निर्देश जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरणात विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे प्रमाण केवळ ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. लवकरच शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळा स्तरावर मोहिम घेण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे. लसीकरण ही बाब ऐच्छिक आहे. तरीही त्याचे महत्व नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या विशेषत: पालकांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. जेणेकरून नागरिक लसीकरणासाठी स्वत:हून पुढे येतील. त्यासाठी पंधरवडा भर सातत्यपूर्ण जनजागृती करावी. शाळा सुरू होताच शिबिरे आणि जागृती कार्यक्रम घ्यावेत. केंद्रांवर सेल्फी पॉईंट बरोबरच इतर अनेक अभिनव संकल्पना राबवाव्यात, त्यादृष्टीने शाळानिहाय नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी पालकांना प्रोत्साहीत करा जिल्ह्यात आतापर्यंत पहिल्या मात्रेचे ८५.५३ टक्के व दुसऱ्या मात्रेचे ६२.३४ टक्के लसीकरण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या १५ ते १८ वयोगटात प्रथम मात्रेचे ५५.६७ आणि दुसऱ्या मात्रेचे ३७.६४ टक्के, तसेच १२ ते १४ वयोगटात पहिल्या मात्रेचे ५२.३३ टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे २२.३० टक्के लसीकरण झाले आहे. राज्याचे सरासरी प्रमाण ६४.७६ टक्के आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचे प्रमाण कमी असून, ते वाढविण्यासाठी मोहिम हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.