आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनाथांची माई पद्मश्री डॉ. सिंधूताई सपकाळ यांचे सामाजिक कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी पुणे येथील कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेड यांनी साथ दिली आहे. माईंच्या चिखलदरा येथील संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी शैक्षणिक साहित्य व दैनंदिन गरजेच्या वस्तू वाटप केल्या आहे. यासोबत त्यांनी माईंच्या सर्व संस्थांना मदतीचा हात दिला आहे. चिखलदरा येथे १९८० मध्ये सिंधूताई सपकाळ यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली. दरम्यान त्यांनी वनवासी गोपालकृष्ण बहुद्देशीय मंडळाची स्थापना करून आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी पहिले सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह सुरू केले. तेव्हापासून शेकडो मुली या ठिकाणाहून शिक्षण घेऊन बाहेर पडल्या आहेत.
वर्षभरापूर्वी माईंचे निधन झाले आणि त्यांच्या सर्व संस्थेवर दुःखाचा पहाड कोसळला. यातून सावरत असताना माईंचे हे पावन कार्य पुढे सुरू रहावे, या हेतुने माईंच्या सर्व संस्थांना एकत्र करून त्यांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने माई परिवारासोबत कल्याणी टेक्नोफोर्ज लि. पुणे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवी नगरकर जोडले गेले. माईंच्या सर्व संस्थांना प्रत्येक महिन्याला नियमित धान्य व किराणा देण्यासाेबतच अनाथ निराधार मुला-मुलींचा शैक्षणिक दर्जा उंचावा यासाठी प्रातिनिधिक स्वरुपात गोष्टी पुरवल्या जात आहेत.
यातूनच चिखलदरा येथील सर्व मुलींसाठी स्कुल बॅग, वही, वॉटर बॉटल, स्टडी टेबल, गरम पाण्याची सुविधा, गादी, पाण्याची टाकी, कार्पेट व पंखा, लाइटची सुविधा, स्वयंपाकाची भांडी कंपनीच्या सीएसआर निधीतून हस्तांतरित करण्यात आला. साहित्य वाटपाच्या कार्यक्रमप्रसंगी मेळघाट गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष धर्मराजकाका खडके, कल्याणी टेक्नोफोर्ज लि. पुणे सीएसआर विभागाचे प्रमुख राहुल सावंत, रूपेश चौबे, शहापूरचे उपसरपंच बाबू हेकडे, मधू येवले, वनवासी गोपालकृष्ण बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष दीपक गायकवाड, सचिव अरुण सपकाळ, अधीक्षिका सरला गळहाट यांच्यासह संस्थेतील ५० मुली उपस्थित होत्या. माईंनी ३० वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला, अशी भावना बांधकाम सभापती रूपेश चौबे यांनी व्यक्त केली.
आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी कुठलीही कमी पडू देणार नाही, आज मुलींना पायी शाळेत जावे लागते पण नजिकच्या काळात सर्वांच्या मदतीने तुम्हाला स्कुल बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही दीपक गायकवाड यांनी दिली. ‘माईंच्या सर्व संस्थांना लागणारी आवश्यक मदत कल्याणी टेक्नोफोर्ज लि. करत आहे, तुम्ही सर्व मुलींनी गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेऊन आकाशाला गवसणी घातली पाहिजे'', अशी अपेक्षा राहुल सावंत यांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.