आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविज्ञान आणि आंतर विद्याशाखा अशा चारही विद्याशाखांमधील पदवी व पद्व्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांना पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धत ‘सीबीसीएस’ (चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम) लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. भारतामध्ये ही पद्धत लागू करणारे अमरावती हे पहिले विद्यापीठ आहे, हे विशेष. येत्या शैक्षणिक सत्रापासून यावर अंमल केला जाईल.
कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या अध्यक्षतेखाली आज, बुधवारी पार पडलेल्या विद्या परिषदेच्या (अॅकडेमिक कौन्सिल) सभेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष असे की सभेच्या पहिल्या चार तासांतच हा विषय चर्चेला आला. त्यावर सर्वांनी आपापली मते मांडली. शेवटी उपस्थित सर्व, ८० सदस्यांनी एकमताने या निर्णयाला संमती दिली. देशोदेशीची शिक्षण पद्धती जवळून जाणून घेणारे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी अलिकडेच माध्यमांशी वार्तालाप करताना गुणदानाऐवजी श्रेणीदान (क्रेडिट सिस्टिम) दर्शवणारी पदवी पद्धत लागू करु, असे सूतोवाच केले होते. आज त्या निर्णयावर मोहोर उमटवण्यात आली आहे.
दरम्यान शिक्षण, अध्यापन, परीक्षा व मूल्यांकन याबाबत ही पद्धत लागू करण्यासाठी आवश्यक असलेले निर्देश, अध्यादेश व विनियम यांनासुध्दा विद्या परिषदेने मान्यता प्रदान केली असून विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालये व शैक्षणिक विभागांना सत्र २०२२-२३ पासून हा निर्णय लागू केला जाणार आहे. सी.बी.सी.एस. पध्दतीबाबत चारही अधिष्ठात्यांनी सविस्तर सादरीकरण विद्या परिषदेच्या सभेत सादर केले. त्यावर चर्चा होवून काही दुरूस्त्याही सुचवण्यात आल्या. पदवी व पद्व्युत्तर अभ्यासक्रमामध्ये सेमिस्टर पध्दत लागू राहणार असून विद्यार्थ्यांना आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.
येत्या शैक्षणिक सत्रापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लवकरच नवीन अभ्यासक्रम, प्रशिक्षण वर्गही घेणार
विद्या परिषदेने सी.बी.सी.एस.ला मान्यता दिल्यानंतर सर्व अभ्यासमंडळे आपापल्या विषयाचे पदवी व पद्व्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम लवकरच तयार करणार आहेत. येत्या शैक्षणिक सत्रापासून नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. सी.बी.सी.एस.बाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचे योजिले आहे. ३० जूनपर्यंत प्रत्येक पदवी अभ्यासक्रमांच्या दोन सेमिस्टरचे सिलॅबस तयार होणार आहे. शिवाय सी.बी.सी.एस. लागू करण्यापूर्वी विषयनिहाय प्रशिक्षण वर्गही घेतले जाणार आहे. प्रत्येकी ५० शिक्षकांचा एक प्रशिक्षण वर्ग अशी आखणी सुरु आहे.
येत्या सत्रापासून होणार अंमलबजावणी जगात ओळख मिळवून देणारी पद्धत
या नव्या निर्णयामुळे सर्व विद्या शाखेतील प्रत्येक अभ्यासक्रमाला क्रेडिट सिस्टिम लागू करणारे अमरावती हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. सध्या जगात जी पद्धत रुढ आहे, तीच येथे लागू करावी, असा माझा प्रयत्न होता. विद्या परिषदेच्या आजच्या सभेमुळे तो खऱ्या अर्थाने अस्तित्वात आला. या पद्धतीमुळे अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला जगात ओळख मिळेल. मला यामुळे मनस्वी आनंद झाला. डॉ. दिलीप मालखेडे, कुलगुरु, अमरावती विद्यापीठ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.