आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावरील पोहरा ते सावंगा गावादरम्यान शनिवारी सायंकाळी एका वाहनाने धडक दिल्यामुळे बिबट मार्गातच निपचित पडला. बिबट्याच्या शरीराची हालचाल बंद झाली होती. त्यामुळे परिसरातील नागरिक, रस्त्याने ये जा करणाऱ्यांनी बिबट्याजवळ प्रचंड गर्दी केली. याचवेळी काहींनी एक चादरही या बिबटच्या अंगावर टाकली. माहिती मिळाल्यामुळे वन विभागाचे पथकही पोहाेचले. दरम्यान बिबट्याला उचलून वन विभागाच्या शुश्रूषा केंद्रात आणण्यासाठी वन विभागाची तयारी सुरू होती, तोच हा बिबट अचानक उठला अन् जंगलात पळाला. या वेळी बिबट उठल्याचे पाहून आजूबाजूला असलेल्यांचे चांगलेच धाबे दणाणले. अखेर वन विभागाने बिबट्याला पकडून उपचारासाठी ताब्यात घेतले आहे.
चांदूर रेल्वे वन परिक्षेत्राच्या हद्दीतील सावंगा गावाजवळ एका अज्ञात वाहनाने शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बिबट्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बिबट रस्त्याच्या कडेला निपचित पडला होता. बिबट पाहण्यासाठी शेकडोंची गर्दी जमली. याचवेळी काहींनी बिबट्याच्या शरीरावर पांढऱ्या रंगाचा कापड टाकून त्याला झाकून ठेवले. याचवेळी चांदूर रेल्वे, वडाळी वन विभाग आणि रेस्क्यू पथकसुद्धा घटनास्थळी पोहाेचले. बिबट निपचित असून त्याची हालचाल नाही, म्हणून वन विभागाचे पथक बिबट्याची तपासणी करण्यासाठी शुश्रूषा केंद्रात घेऊन जावे, यासाठी पिंजरा वाहनातून खाली काढतच होते. त्याचवेळी हा निपचित पडलेला बिबट अचानक उठला आणि सैरावैरा जंगलात पळाला. बिबट अचानक उठताच त्या ठिकाणी असलेले शेकडो लोक मात्र इकडे तिकडे पळाले. सुदैवाने बिबट्याने नागरिकांच्या दिशेने धाव न घेता जंगलात धाव घेतली. हे पाहताच काही क्षणासाठी वन विभागाचे पथकसुद्धा ‘अलर्ट’ झाले होते. पथकाने तत्काळ जंगल भागात जाऊन बिबट्याचा शोध घेतला.
जबर धक्का बसल्यामुळे बिबट बेशुद्ध झाला होता वाहनाने दिलेल्या धडकेमुळे बिबट्याला जबर मानसिक धक्का बसला असावा, त्यामुळेच तो बेशुद्ध झाला होता. या वेळी शेकडो नागरिकांची बिबट पाहायला गर्दी झाली होती. मात्र अचानक बिबट उठला आणि जंगलात गेला. आम्ही बिबट्याला ताब्यात घेतले असून, त्याची तज्ज्ञांकडून तपासणी सुरू आहे. भानुदास पवार, आरएफओ, चांदूर रेल्वे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.