आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलीकडे सायबर चोरट्यांनी लोकांना गंडवण्यासाठी ‘आपले जुने वीज बिल भरणे बाकी असल्यामुळे आपला वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे’, असा सोशल मीडियावर मेसेज पाठवून वीजपुरवठा सुरू ठेवायचा असेल तर संबंधित क्रमांकावर कॉल करा, असा संदेश प्राप्त होताच शहरातील एका ५८ वर्षीय व्यक्तीने त्या क्रमांकावर कॉल केला. एक अॅप डाऊनलोड केले. त्यानंतर मात्र, दोन तासांत त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख २५ हजार रुपये उडवण्यात आले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. १५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक झालेला हा जिल्ह्यातील पहिलाच प्रकार आहे.
अरुण भाऊराव चुने (५८, रा. दत्त चौक, बुधवारा, अमरावती) असे फसगत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अरुण चुने हे सेवानिवृत्त आहेत. मंगळवारी (दि. १४) दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्या सोशल मीडियावर (व्हाट्सअॅप) एक मेसेज आला. आपले जुने विज बिल भरणे बाकी असल्यामुळे आपला वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. वास्तविकता चुने यांनी वीजबिल पूर्वीच भरलेले आहे. त्यांच्याकडे बिल थकीत नाही. असे असतानाही सायबर हल्लेखोराने त्यांना बतावणी केली. वीजपुरवठा खंडित होऊ नये, म्हणून चुने यांनी तत्काळ त्या मेसेज सोबत असलेल्या क्रमांकावर कॉल केला. त्यावेळी त्यांना एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांनी अॅप डाऊनलोड करताच सायबर हल्लेखोराने अवघ्या दोन तासांच्या कालावधीत चुने यांच्या खात्यातून २ लाख २५ हजार रुपये ऑनलाइन उडवून त्यांची फसवणूक केली. ही बाब लक्षात येताच बुधवारी (दि. १५) चुने यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
महावितरण सोशल मीडियावर मेसेज पाठवत नाही
महावितरणच्या नावाचा गैरवापर सुरू केला आहे. मात्र महावितरण कधीही कोणत्याही ग्राहकाला सोशल मीडियावर मेसेज पाठवत नाही. तसेच कोणत्याही ग्राहकाला कॉल बॅक करायला सांगत नाही. महावितरण सिस्टिम जनरेटेड टेक्स्ट मेसेज पाठवतात. त्या मेसेजचे VM-MSEDCL व VK-MSEDCL असे सेंडर आयडी आहेत, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.