आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी आज, सोमवारी साबनपुरा येथील मशिदीमध्ये (मरकज) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अमरावती शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मशिदीमध्ये असा उपक्रम घडून आला असून सर्वधर्म समभावाचे याहून वेगळे उदाहरण असू शकत नाही, अशा प्रतिक्रिया त्यानिमित्ताने व्यक्त केल्या जात आहे. सदर शिबिरात आतापर्यंत 30 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
साबनपुरा मशिदीच्या हॉलमध्ये आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी माजी महापौर विलास इंगोले, शेतकरी नेते विजय विल्हेकर, शिवसेनेचे सुनील खराटे, सुरेश रतावा, प्रा. डॉ. संजय तिरथकर, निसारभाई, जावेदभाई, जाणीव प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन चौधरी, प्रदीप पाटील, रफीकभाई, निवृत्त पोलिस निरीक्षक शेख सुलतान, गुन्हे शाखेचे पीआय अर्जुन ठोसरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
रयतेच्या आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा म्हणून रुढ असलेल्या शिवराज्याभिषेक दिनी भरविण्यात आलेल्या या शिबिराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मशिदीमध्ये पहिल्यांदाच आयोजित हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा अनोखा कार्यक्रम आहे. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, बौद्ध लेण्यांवरून समाजात विखार पसरवण्याचे काम काही कट्टरपंथीय धार्मिक लोक करत असतात. याच वातावरणात एकतेचा आणि समानतेचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेला हा उपक्रम सकाळी 10 वाजता सुरू झाला.
रक्तदानासाठी दुपारी 2 पर्यंतची वेळ देण्यात आली होती. परंतु उशीरा दुपारपर्यंतही रक्तदाते त्याठिकाणी पोहोचण्याचे संदेश प्राप्त झाल्यामुळे सायंकाळपर्यंत हा उपक्रम चालला. शिव, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या स्वप्नातील मजबूत आणि सर्वसमावेशक भारत घडविण्यासाठी या रक्तदान सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वांचे आयोजकांनी मनापासून आभार मानले आहे. दिवसभरात या शिबिरात अनेकजण रक्तदान करणार आहेत. गुलशन स्पोर्टिंग क्लब, जाणीव प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, महात्मा फुले सेवा संघ, राष्ट्रसेवा दल व दि ग्रेट टिपू सुलतान ब्रिगेडच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
अनुकरणीय उपक्रम
हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम केवळ स्तुत्यच नाही तर अनुकरणीय आहे. गेल्या काही दिवसात शहरात समाजा-समाजात भेद निर्माण करणाऱ्या काही घटना घडल्या. त्यामुळे शहराच्या नावाला गालबोट लागले होते. परंतु अशा प्रकारच्या उपक्रमामुळे ती कटू ओळख पुसून टाकण्याला मोठी मदत होत असल्याची प्रतिक्रिया माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचवेळी विलास इंगोले व सुनील खराटे यांनी समाजात दुही पसरविण्याचे काम करणाऱ्यांसाठी ही मोठी चपराक आहे, असे सांगत या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.