आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेट निवडणुकीबाबत विद्यापीठाची प्रक्रिया क्लिष्ट:पत्रकार परिषदेत अभाविपचा आरोप; 10 ऑगस्टला आंदोलन

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांच्या हिताच्यादृष्टीने अत्यंत महत्व राखणाऱ्या सिनेट (अधीसभा) निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असून विद्यापीठ प्रशासन याबाबत हेकेखोर धोरण घेत असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) लावला आहे. दरम्यान येत्या 9 ऑगस्टपर्यंत सकारात्मक पावले न उचलल्यास 10 ऑगस्टला संघटनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

अभाविपचे सिनेट निवडणूक प्रमुख प्रा. स्वप्नील पोतदार यांनी ही माहिती दिली. यांच्यामते सिनेट निवडणुकीसाठी सद्या मतदार नोंदणी सुरु आहे. ही नोंदणी ऑनलाईनच केली जाईल, असे फर्मान विद्यापीठाने सोडले आहे. विशेष असे की उभ्या महाराष्ट्रात केवळ अमरावती विद्यापीठानेच अशी भूमिका घेतली असून इतरत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. दुसरी आश्चर्यजनक बाब अशी की ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अनेक क्लिष्ट बाबींचा समावेश करण्यात आला आहे. अर्ज भरताना त्यावर स्वाक्षरीची मागणी करणे गैर नाही. परंतु ती विशिष्ट आकारमानाचीच असावी, अशी अट आहे. शिवाय शुल्क अदा करण्यासाठी दिलेले पोर्टल सदोष असल्याने अनेकांना दोनवेळा पैसे भरावे लागतात. अर्ज भरताना ओटीपी ही नवी भानगडही जोडण्यात आली आहे.

मुळात ज्यांच्याकडे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेला अ‌ॅण्ड्राईड फोन, लॅपटॉप नाही, त्यांनी हा अर्ज कसा भरावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातही ग्रामीण भागामध्ये उद्धभवलेली पूरस्थिती आणि संततधार पाऊस यामुळे इंटरनेटचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या सर्व मुद्द्यांना धरुन कुलगुरुंना यापूर्वी पाचवेळा निवेदने देऊन पाचव्या निवेदनावेळी घेरावही घालण्यात आला. परंतु विद्यापीठ अजूनही आपला हेका सोडायला तयार नाही. अभाविपच्या मागणीमुळे विद्यापीठाने मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ दिली. परंतु १० ऑगस्टऐवजी ती 20 ऑगस्टपर्यंत दिली जावी आणि ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी अर्ज स्वीकारले जावेत, अशी आमची मागणी आहे. त्यासाठीच १० ऑगस्टला तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. पत्रकार परिषदेला विदर्भ प्रांत मंत्री अखिलेश भारतीय, महानगर सहमंत्री सावनी सामदेकर, विद्यापीठ प्रमुख अनुराग बालेकर, महानगर विस्तारक समर्थ रागीट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व दहाही जागा लढणार

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटमध्ये विद्यार्थी संवर्गाच्या दहा जागा आहेत. या सर्व जागा लढण्याची तयारी अभाविपने केली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. गेल्यावेळी अभाविपने 6 जागा लढून तीन जागांवर विजय प्राप्त केला होता, अशी पुरक माहितीसुद्धा यावेळी देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...