आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका आरोपीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या जखमी आरोपीवरही प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल असल्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पोलिसांची तैनाती रुग्णालयात करण्यात आली होती. मात्र हा आरोपी शुक्रवारी (दि. ११) रुग्णालयातून पळून गेला. या प्रकरणी पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शनिवारी (दि. १२) फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर यांची तडकाफडकी विशेष शाखेला बदली केली असून, दोन पोलिसांना निलंबित केले आहे.
फ्रेजरपुराचे नवीन ठाणेदार म्हणून विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांना जबाबदारी दिली आहे. तसेच पोलिस नाईक नईम बेग व संजय डेरे या दोन अंमलदारांना निलंबित केले आहे. नितीन ऊर्फ बबलू भगवंत गाढे (३६, रा. यशोदानगर) असे रुग्णालयातून परस्पर निघून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. ६ नोव्हेंबरला सायंकाळी यशोदानगर परिसरातील एका वाईन शॉपीवर बबलू गाढे व गोलू चौधरी या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर दोघांनीही एकमेकांवर चाकू हल्ला चढवला होता. त्यामुळे पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरुन दोघांवरही प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या हल्ल्यात बबलूच्या पोटात चाकू लागला होता. त्यामुळे त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मागील पाच दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू असल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती मात्र प्रकरण गंभीर असल्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांनी या खासगी रुग्णालयात त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पोलिस अंमलदार तैनात केले होते. असे असतानाही बबलू गाढे शुक्रवारी सायंकाळी रुग्णालयातून पसार झाला. या प्रकरणाची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन ठाणेदारांची बदली करुन दोन अंमलदारांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.